दौंड-काष्टी दरम्यान मेगा ब्लॉक : 23 ते 25 जानेवारीदरम्यान 16 रेल्वेगाड्या रद्द
पुणे विभागात दुहेरीकरणासाठी होणार कामे, पुणे-अमरावती, गरीब रथ, हमसफर, नांदेड, शिर्डी गाड्यांवर परिणाम
या गाड्या रद्द
या ब्लॉकमुळे पुणे-अमरावती, अमरावती-पुणे, पुणे-नागपूर गरीब रथ, नांदेड-पुणे, हमसफर, शिर्डी, पनवेल-नांदेड आदी महत्त्वाच्या गाड्या 23 ते 25 जानेवारीदरम्यान विविध तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-अमरावती एक्सप्रेस, अमरावती-पुणे एक्सप्रेस, पुणे-नागपूर व नागपूर-पुणे गरीब रथ, पुणे-नांदेड, नांदेड-पुणे, पुणे-अजनी हमसफर, दादर-साईनगर शिर्डी या 16 गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यात यशवंतपूर-चंदीगड, हुबळी-हजरत निजामुद्दीन, जम्मूतावी-पुणे, हजरत निजामुद्दीन-वास्को-दा-गामा तसेच पुणे-गोरखपूर या गाड्या त्यांच्या नियोजित मार्गाऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा किंवा सोलापूर, लातूर, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे धावतील. दरम्यान, पुणे-अमरावती, पुणे-लखनऊ, पुणे-हाटिया आणि पुणे-जबलपूर या काही गाड्या विविध तारखांना 1 ते 2 तासांपेक्षा अधिक उशिराने सुटणार आहेत.तसेच अमरावती-पुणे, म्हैसूर-हजरत निजामुद्दीन आणि नवी दिल्ली-केएसआर बंगळूर या गाड्यांचेही वेळापत्रक बदलून त्या नियंत्रीत करण्यात येणार आहेत.

गाडीची स्थिती तपासून करा प्रवासाचे नियोजन
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा ब्लॉक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षित व वेगवान रेल्वेसेवेसाठी अत्यावश्यक असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

