अवकाळी पाऊस होऊनही यंदा हतनूरमध्ये गतवर्षापेक्षा अल्प साठा
गतवर्षाच्या तुलनेत यंदा सहा टक्के घट
भुसावळ (13 जानेवारी 2026) : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा दिवाळीच्या दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने उशिरापर्यंत पाण्याची आवक होती. रब्बीसाठी आवर्तन दिल्यानंतर रविवार, 11 रोजी धरणात 359.80 दलघमी जलसाठा शिल्लक आह. तर गेल्या वर्षी तो 374.50 दलघमी होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणात सहा टक्के कमी जलसाठा आहे.
सहा टक्के जलसाठा कमी
भुसावळ विभागासह पाणलोटक्षेत्रात यंदा दिवाळीच्या दरम्यान अवकाळी पाऊस झाला. यामुळे यंदा उशिरापर्यंत पाण्याची आवक राहिली. दरम्यान हतनूर धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन दिल्यानंतर सध्या धरणात 359.80 दलघमी जलसाठा तर 213.530 मिटरची जलपातळी आहे. गेल्या वर्षी 11 जानेवारीला धरणात 213.790 मिटर जलपातळी होती. तर 374.50 दलघमी जलसाठा होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा 6 टक्के कमी जलसाठा आहे. हतनूर धरणातून यंदा रब्बीसाठी पहिले आवर्तन देण्यात आले आहे तर सोमवारी भुसावळ नगरपालिका, दीपनगर औष्णिक केंद्रासाठी मोसमातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

पुरेसा पाणीपुरवठा होणार
आगामी काळातही धरणातून पाणीपुरवठा होणार्या प्रकल्प, शहरांना वेळेत पुरवठा केला जाणार आहे. साधारण आठवड्याभराने भुसावळ शहरासह दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ रेल्वे प्रशासनासाठी तापीनदीपात्रातून आवर्तन दिले जाणार आहे. सध्या शेळगाव बॅरेजचे बॅकवॉटर बंधार्यापर्यंत आहे तर दुसरीकडे बंधार्याची जलपातळी घसरली आहे.हतनूरवर अवलंबून असलेल्या प्रकल्प, शहरे, गावे, एमआयडीसी आदींना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

