वांग्यापेक्षा कांद्याच्या पातीचे दर अधिक : पार्ट्यांची रंगत वाढणार
उत्पन्न वाढल्याने भरिताचे वांगे 20 रुपये किलोपर्यंत घसरले
भुसावळ (13 जानेवारी 2026) : गुलाबी थंडीत भरित पार्टीची रंगतच न्यारी असते. या काळात वांग्याचे प्रतिकिलो दर 100 ते 120 रुपये किलो असते. मात्र गेल्या पंधरवड्यापासून थंडी, मध्येच ढगाळ वातावरण अशा पोषक वातावरणामुळे वांग्याचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे दरात निम्याने घसरण होऊन हे दर सध्या 20 रुपये किलोपर्यंत घसरले आहे. तर दुसरीकडे भरितामध्ये वांग्यासोबत आवश्यक असलेल्या कांदा पातीचेे दर मात्र 60 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत.
प्रति किलो 20 रुपये दर
भरताच्या वांग्यांसाठी आसोदा, भालोद व बामणोद ता. यावल येथील वांगे प्रसिध्द आहेत. या गावाची भौगोलिक स्थिती, जमिनीचा प्रकार व हवामान यामुळे लुसलुशीत चवदार वांग्यांचे उत्पादन मिळते. गावातील सुमारे 25 ते 30 शेतकरी दरवर्षी 20 ते 22 हेक्टरवर वांग्यांची लागवड करतात. यातून किमान महिन्यात कोटींची उलाढाल होते. दिवाळीच्या काळात नोकरीनिमित्ताने बाहेर शहरांमध्ये स्थायीक झालेले रहिवासी गावाकडे येतात. यामुळे मित्र मंडळी व परिवारांच्या भरीत पार्टींची रंगत वाढते. यामुळे या काळात वांग्यांचे दर 120 किलो असतो. मात्र वांग्याचे उत्पन्न वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने भरिताच्या वांग्यांचे उत्पन्न अधिक आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. सध्या बाजारात 20 किलोप्रमाणे भरिताच्या वांग्यांची विक्री होत आहे तर बामणोद, आसोदा व भालोद येथील वांग्यांना 30 ते 35 रुपये किलो दर मिळत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. बाजारात सध्या बामणोद व भालोदच्या नावाने इतर भागांतून येणार्या लांबोळ्या वांग्यांचीही विक्री होत आहे.

बामणोद, भालोद, आसोद्याच्या वांग्यांचे वैशिष्ट
बामणोदच्या वांग्याचे वैशिष्ट असे आहे की हे वांगे आकाराने मोठे व लांबोळे, चमकदार असते. तर मऊ व लुसलुशीत वजनाने अंत्यत हलके असलेल्याने या वांग्यांना अधिक पसंती असते. एका किलोमध्ये साधारण चार ते पाच वांगे सहज बसतात. मात्र इतर ठिकाणचे वांगे किलोत केवळ दोन ते तीनच येतात. वैशिष्टपूर्ण चवीमुळे हे वांगे ग्राहकांच्या पसंतीस पडले आहेत. दिवसेंदिवस बामणोदच्या वांग्यांची क्रेझ वाढत आहे.
वांग्यापेक्षा कांदा पात महाग
खान्देशी पध्दतीने भरित तयार करण्यासाठी कांद्याची पात हा अत्यावश्यक घटक आहे. सध्या बाजारात वांगे स्वस्त असले तरी कांद्याची हिरवी पात मात्र महागली आहे. सध्या 60 रुपये किलोप्रमाणे कांदा पातीची विक्री होत आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर अधिक असल्याने हिरव्या पातही भाव खात आहेत. आगामी काळात हे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
ग्राहकांचे प्रमाण कमी झाले
अवकाळी पावसामुळे यंदा वांग्यांचा हंगाम तब्बल सव्वा ते दीड महिने लांबला. सध्या थंडी, ढगाळ वातावरण या पोषक स्थितीमुळे वांग्यांचे उत्पन्न वाढले आहे. याच काळात ग्राहकांचे प्रमाण कमी झाले, यामुळे दर घसरल्याचे विक्रेता संजय पाटील म्हणाले.

