पाडळसेतील श्री स्वामिनारायण मंदिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Educational materials distributed to students at Shri Swaminarayan Temple in Padalse पाडळसे, ता.यावल (13 जानेवारी 2026) : श्री स्वामिनारायण मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथासोहळ्याच्या समारोपप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद व समाधान स्पष्टपणे दिसून आला.
यांची होती उपस्थिती
श्रीमद् भागवत कथेचे वक्ते शास्त्री ईश्वर स्वरूपदासजी स्वामी यांच्या पावन उपस्थितीत व शास्त्री के.के.शास्त्री यांच्या विशेष उपस्थितीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन शास्त्री नयन प्रकाशदासजी यांनी केले. यावेळी अनेक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्या हीच खरी संपत्ती
नोटबुक वितरणाच्या वेळी शास्त्री के. के. शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक उपदेश केला. विद्या हीच खरी संपत्ती असून शिस्त, संस्कार आणि परिश्रम यांमुळेच जीवनात यश मिळते, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. श्रीमद् भागवत कथेतील आदर्श जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आत्मसात करावीत, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवी उमेद व प्रेरणा निर्माण झाली. मंदिराच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात शिक्षणप्रेम व संस्कारांची रुजवण करणारा ठरला.
या समारंभानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी 4:30 ते 7:30 या वेळेत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. श्री स्वामिनारायण मंदिर, पाडळसा यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेला हा उपक्रम केवळ धार्मिकच नव्हे, तर शैक्षणिक व सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत उल्लेखनीय ठरला, असा अभिप्राय सर्वत्र व्यक्त झाला.

