धरणगावात वास्तव्यास असलेल्या इराणी महिलेचे ‘पाकिस्तान कनेक्शन’
सिम कार्ड पुरवणार्या तिसर्या आरोपीला बेड्या; देशद्रोही कारवायांच्या संशयावरून न्यायालयाने जामीन फेटाळला
The ‘Pakistan connection’ of the Iranian woman residing in Dharangaon धरणगाव (19 जानेवारी 2026) : इराणी महिलेचे धरणगावात वास्तव्य आढळल्याने खळबळ उडाली होती. महिला केवळ बेकायदेशीर वास्तव्यापुरता मर्यादित नव्हती तर तिचे धागेदोरे थेट शत्रूराष्ट्र पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे समोर आले असून संशयितांनी पाकिस्तानमधील ‘सलमान भाई’ आणि ‘सलमान खान’ नावाच्या व्यक्तींशी व्हॉट्सप आणि व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधल्याचे समोर येताच यंत्रणा खळबडून जागी झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन फेटाळला आहे.
काय आहे नेमके प्रकरण
धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांच्या मोबाईल आणि कॉल रेकॉर्डची कसून तपासणी केली असा पोलिसांना धक्कादायक पुरावे हाती लागले. या आरोपींनी पाकिस्तानमधील व्यक्तींशी आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे ‘सलमान भाई’ आणि ‘सलमान खान’ अशा नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर व्हॉट्सप चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले आहेत. धरणगावात बसून पाकिस्तानात व्हिडीओ कॉल कशासाठी? आणि हा ‘सलमान’ नेमका कोण? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

तिसरा आरोपी गळाला ; तेलंगणा कनेक्शन उघड
पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील तिसर्या आरोपीलाही 8 जानेवारी रोजी अटक केली. हा संशयित मूळचा तेलंगणाचा रहिवासी असून सध्या धरणगावात वास्तव्यास होता. या इराणी महिलेला स्थानिक पातळीवर वापरण्यासाठी सिम कार्ड याच व्यक्तीने पुरविल्याचा आरोप आहे. परदेशी नागरिक, त्यातही संशयास्पद हालचाली असताना तिला सिम कार्ड देणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात ; जामीन नाकारला
विदेशी महिलेला आश्रय देणे आणि पाकिस्तानशी संपर्क असणे, ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे मत सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडले. अॅड.गजानन पाटील आणि संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस तपासात निष्पन्न झालेल्या या धक्कादायक बाबींमुळे धरणगाव न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी बाहेर आल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते आणि तपासात अडथळा येऊ शकतो, यामुळे न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.







