65 हजारांची लाच भोवली : नंदुरबार मत्स्य व्यवसाय विभागाचा सहाय्यक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Accepting a bribe of 65,000 rupees proved costly: The Assistant Commissioner of the Nandurbar Fisheries Department caught in the ACB’s net भुसावळ (23 जानेवारी 2026) : मत्स्य व्यवसायाचा ठेका रद्द करण्याची भीती घालून तडजोडीअंती 65 हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारताना नंदुरबार शहरातील मत्स्य व्यवसाय विभागाचा सहाय्यक आयुक्त तथा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण गणेश पाडवी (54) यास नंदुरबार एसीबीने शुक्रवार, 23 रोजी सायंकाळी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील तक्रारदाराने मत्स्य पालनाचा ठेका घेतला आहे शिवाय 30 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीच्या सभेत रंगावली तलाव, उंबर्डी, ता.नवापूर येथील तलावाचा ठेका 1 जुलै 2025 ते 30 जून 2030 दरम्यानच्या कालावधीसाठी चेअरमन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादीत खैरवे, ता.नवापूर यांच्या मान्यतेने तक्रारदाराला मिळाला आहे. हा ठेका मंजूर केल्याच्या मोबदल्यात एक लाखांची लाच मत्स्य व्यवसाय अधिकारी किरण पाडवी याने त्यावेळी मागितली होती मात्र तक्रारदाराकडे पैसे नसल्याने त्यांनी लाच रक्कम दिली नाही.
ठेका रद्द करण्याची घातली भीती
9 जानेवारी 2026 रोजी तक्रारदाराला पाडवी याने कार्यालयात बोलावले व तक्रारदाराने तलावात मासे न टाकल्याचे कारण देत तक्रारदाराचा ठेका रद्द करून तो अन्य कुणाला देण्याची भीती घालून तसे न करण्यासाठी दोन लाख रुपये अन्य इसमाच्या खात्यात ट्रान्सपर करण्यास सांगून 65 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने नंदुरबार एसीबीडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणीअंती सापळा रचून आरोपी पाडवीला कार्यालयातच पकडण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदाल देवराम गावीत, हवालदार विजय ठाकरे, हवालदार हेमंतकुमार महाले, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, हवालदार संदीप खंडारे, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने केली.

