धुळे तालुका पोलिसांनी लक्झरीतून गुटखा तस्करीचा डाव उधळला : आठ लाखांच्या गुटख्यासह तिघे जाळ्यात
इंदौरहून मालेगावात गुटख्याची वाहतूक : लक्झरी चालक-मालकासह सहा जणांविरोधात गुन्हा
Dhule taluka police foiled a gutkha smuggling attempt in a luxury vehicle : Three people arrested along with gutkha worth eight lakhs धुळे (23 जानेवारी 2026) : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची थेट लक्झरीतून इंदौरहून मालेगावात वाहतूक होणार असल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाल्याने पथकाने संशयीत वाहनातून आठ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी चालकासह तिघांना अटक करण्यात आली असून मूळ मालक, मॅनेजरसह सहा जणांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे तर तस्करांनी आता खाजगी वाहनांची गुटखा तस्करीसाठी वापर सुरू केल्याने पोलिसांनी आता कारवाईचा फास अधिक जोमाने आवळावा लागणार आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना 20 रोजी इंदौर येथून श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी (एम.पी.41 झेड.जे.7444) द्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाल्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी पोलीस दूरक्षेत्रामसेार बुधवार, 21 रोजीचे रात्री दोन वाजेच्या सुमारास श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो बस येताच तिला थांबवण्यात आले. पंचांसमक्ष लक्झरीच्या डिक्कीची तपासणी व झडती घेतली असता त्यात वाहनांतील प्रवाश्यांच्या बॅगच्या शेजारीच पांढर्या गोण्या आढळल्याने त्याची तपासणी केली असता त्यात राजश्री पान मसाला, रजनीगंधा पानमसाला व आरएमडी पानमसाल्यासोबत सुगंधीत तंबाखूचा एकूण आठ लाख 18 हजार 85 रुपयांचा साठा आळढल्याने तो जप्त करण्यात आला तसेच दिड कोटींची लक्झरी बसही जप्त करण्यात आली.
या संशयीतांविरोधात गुन्हा
श्यामोली परिवहन कंपनीचा मॅनेजर अरुप सरकार (इंदौर), शर्मा ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक कमल शर्मा (इंदौर), पुणे येथील प्रवीण नावाचा व्यक्ती, लक्झरी चालक सचिन दिनेश बाडोले (31, रा.365 आवास नगर देवास, मध्यप्रदेश), बिरजूदास रतनदास बैरागी (48, रा.इंदौर, मध्यप्रदेश), क्लीनर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सूर्यवंशी (इंदौर) यांच्याविरोधात हवालदार चेतन कंखरे यांच्या तक्रारीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान ड्रायव्हर सचिन दिनेश, बिरजूदास रतनदास बैरागी व कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक छाया पाटील, हवालदार गणेश शांताराम काळे, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार चेतन कंखरे, हवालदार सुमित ठाकुर, कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर, कॉन्स्टेबल निलेश पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, कॉन्स्टेबल योगेश पाटील आदींच्या पथकाने केली.

