भुसावळातील नाल्यामुळे पंचशिल नगर-गंगाराम प्लॉटमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नाल्याचे खोलीकरण, संरक्षण भिंत बांधण्याची पालिकेकडे मागणी
The drain in Bhusawal is endangering the health of the residents of Panchsheel Nagar-Gangaram Plot भुसावळ (24 जानेवारी 2026) : शहरातील पंचशिल नगर व गंगाराम प्लॉट परिसरातून जाणारा नाला येथील नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यालगत अनेक घरे असून परिसरात सुमारे पाच सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयांतील घाण थेट नाल्यात मिसळत असल्याने दुर्गंधी, साचलेला कचरा व प्लास्टिक कॅरीबॅगमुळे नाल्याचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला आहे.
अस्वच्छतेने आरोग्य आले धोक्यात
नाल्यातील अस्वच्छतेमुळे परिसरातील लहान मुले व वृद्ध सतत आजारी पडत असून काही बालके व वृद्धांचे मृत्यू झाल्याचाही दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. घरात जेवण करतानाही दुर्गंधी सहन करावी लागत.े डोळ्यांसमोर दिसणार्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नाल्यात सतत डुकरे फिरत असल्याने त्यांच्या अंगावरील घाण घरांजवळ पसरते त्यामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित वॉर्डमधील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे नाल्याचे तातडीने खोलीकरण करावे तसेच संरक्षण भिंत बांधून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

