ठाकरे गटाचे चार नगरसेवक हरवले ; बॅनर झळकल्याने सर्वत्र खळबळ
Four corporators from the Thackeray group have gone missing ; the appearance of banners has caused a stir everywhere मुंबई (24 जानेवारी 2026) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरे गटाचे 11 उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत मात्र त्यापैकी चार नगरसेवक 16 जानेवारीपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला असून कल्याण पूर्व परिसरात या नगरसेवकांचे हरवले आहेत अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.
बेपत्ता नगसेवकांमुळे वाढले गुढ
सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू असतानाच, नगरसेवकांच्या पळवापळवीच्या संशयाने राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना ठाकरे गटाचे चार शिलेदार अचानक गायब झाले आहेत. बेपत्ता झालेल्या नगरसेवकांमध्ये मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांशी कोणताही संपर्क होत नसल्याने अखेर ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे मात्र तक्रार देऊनही पोलिस प्रशासन सुस्त असून नगरसेवकांचा शोध घेण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा गंभीर आरोप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
पोलिस आणि सत्ताधार्यांवर संशयाची सुई
नगरसेवकांचा शोध घेण्यात पोलिस हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर कडक भूमिका घेत म्हटले आहे की, आमच्या नगरसेवकांना दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली पळवून नेले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने कारवाई करावी लागेल.
रस्त्यावर उतरले शिवसैनिक
संजय राऊत यांच्या इशार्यानंतर आज कल्याण पूर्व भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. बेपत्ता नगरसेवकांचे फोटो असलेले पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. कुणालाही हे नगरसेवक आढळून आल्यास शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

