साकरीत दोन्ही मैत्रिणींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
In Sakri, the last rites of both friends were performed simultaneously भुसावळ (29 जानेवारी 2026) : ट्यूशनला निघालेल्या दोन शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनांना आरोपींनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील साकरी येथे मंगळवार, 27 रोजी घडली होती. या घटनेनंतर नराधम आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर बुधवारी सकाळी दोन्ही मैत्रिणींच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
काय घडले साकरीत ?
साकरीतील 15 वर्षीय दोन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शिकवणीला जात असताना गावातील एका अल्पवयीन मुलाने त्यांना आपल्या मोटारसायकलवर बसवले आणि गावालगत असलेल्या अविनाश फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ नेऊन दोन्ही मैत्रिणींना विहिरीत ढकलून दिले. विशेष म्हणजे विद्यार्थिनींचे दप्तरसुद्धा संशयितासोबतच होते. या घटनेत दोन्ही मैत्रिणींचा मृत्यू झाला. घटनेनंतर मंगळवारी सायंकाळी दोन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह जळगाव येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे विच्छेदन केले.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बुधवारी सकाळी विच्छेदनानंतर मृतदेह साकरी येथे आणण्यात आले. सकाळी 10 वाजता स्मशानभूमीत एकाच वेळी दोन्ही मैत्रिणींवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात कुठलाही अनुचितप्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त कायम आहे.
