अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
Investigation into Ajit Pawar’s plane crash begins मुंबई (30 जानेवारी 2026) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बुधवारी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. विमान अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याने याबाबतची चौकशी एएआयबी या संस्थेने सुरू केल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते पत्र
विमान अपघात तपास ब्यूरो (आयबी) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करावी, असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ब्लॅकबॉक्स सापडल्याने अनेक बाबींचा होणार उलगडा
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी म्हटले की, विमान अपघात ब्यूरो या संस्थेने तपास सुरू केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल.
चौकशीचा अहवाल राज्य सरकारलाही देणार
किंजरापु राममोहन नायडू म्हणाले, या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली आहे. चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, अशी माहिती नायडू यांनी दिली आहे.
