अजितदादा पवार पंचत्वात विलीन
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी
Ajitdada Pawar has merged into the five elements बारामती (30 जानेवारी 2026) : बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. यावेळी हजारो समर्थक, कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले.
देशभरातील नेत्यांची उपस्थिती
यावेळी पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लोकही अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. गुरुवारी रात्री उशिरा बारामतीत लोक येऊ लागले. सकाळी अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. समर्थक दुचाकी, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बसेसमधून आले. अंत्ययात्रा एक ते दोन किलोमीटरपर्यंत पसरली.

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
बारामती येथे बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव होते. त्यातील एकही जण वाचू शकला नाही.
