डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 27 ते 29 मार्चदरम्यान बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी

अनुभवी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी अन् शस्त्रक्रिया होणार


जळगाव (24 मार्च 2026) : जन्मत:च हृदयाला छिद्र असणे किंवा इतर जन्मजात हृदयरोगामुळे अनेक बालकांना लहान वयातच गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. अशा बालकांना वेळेवर योग्य निदान व उपचार मिळावेत यासाठी जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे 27, 28 आणि 29 मार्च रोजी लहान बालकांच्या हृदयाची विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जन्मत:च हृदयाला असलेले छिद्र तसेच बालकांमध्ये आढळणार्‍या इतर हृदयविकारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. अनेक वेळा जन्मजात हृदयविकाराची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसून येत नाहीत. बालकाला श्वास घेण्यास त्रास होणे, वजन नीट न वाढणे, लवकर थकवा येणे, अशी लक्षणे आढळू शकतात. अशा स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे असते. या विशेष शिबिरामध्ये तज्ज्ञ व अनुभवी हृदयतज्ज्ञ डॉक्टरांची टीम बालकांची तपासणी करणार असून आवश्यक त्या आधुनिक तपासण्या देखील करण्यात येणार आहेत. बालकांच्या आरोग्याची सखोल तपासणी करून त्यानुसार पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे.शिबिरात तपासणी झाल्यानंतर ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल, अशा गरजू बालकांवर शासनाच्या विविध योजनांंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


तज्ज्ञांच्या टीमकडून शस्त्रक्रिया
अनुभवी व तज्ज्ञ डॉ.वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धवलकुमार खडके, अपोलो रुग्णालयाचे डॉ. भूषण चव्हाण, डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. झिशान, डॉ. मनमिता रेड्डी अशी तज्ज्ञांची टीम शस्त्रक्रिया करणार आहे. विशेष म्हणजे ह्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9403337494 व 7030571111 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दर आठवड्याला तपासणी
याशिवाय या विशेष शिबिरानंतरही बालकांच्या हृदयविकारांच्या तपासणीची सुविधा नियमित उपलब्ध राहणार आहे. दर आठवड्याच्या सोमवार व बुधवार या दिवशी डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात बालकांची हृदय तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या बालकांच्या आरोग्याविषयी वेळेवर मार्गदर्शन मिळणार आहे.जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांना वेळेवर निदान व उपचार मिळाल्यास त्यांचे आयुष्य निरोगी आणि सामान्य होऊ शकते. त्यामुळे ज्यांच्या बालकांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसत आहेत किंवा संशय आहे, अशा पालकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !