गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव : डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांचे यश
जळगाव (6 जुलै 2026) : गर्भधारणेदरम्यान उद्भवलेल्या अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या अवस्थेत 20 वर्षीय महिलेचे प्राण वाचविण्यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांना यश आले आहे. गर्भाशयातील गर्भपिशवीत गर्भ न राहता तो नळीत वाढल्याने (एटोपिक प्रेग्नन्सी) गर्भ पोटातच फुटला आणि मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता.
तातडीने निदान करून शस्त्रक्रिया करण्यात आल्याने महिलेचा जीव वाचला. ममता नामक 20 वर्षीय महिला अचानक तीव्र पोटदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा या तक्रारींमुळे गंभीर अवस्थेत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात आल्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञांनी तातडीने तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान तिचा रक्तदाब अत्यंत कमी झालेला आढळला, तर नाडीचे ठोके वेगाने वाढले होते. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच त्वरित आवश्यक रक्ततपासण्या व सोनोग्राफी करण्यात आली.तपासणीमध्ये गर्भाशयात गर्भ नसून तो फलोपियन नलिकेत वाढत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, गर्भधारणेची नळी फुटल्याने पोटात मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला रप्चर्ड एटोपिक प्रेग्नन्सी विथ हिमोपेरीटोनियम असे म्हटले जाते. ही अवस्था अत्यंत धोकादायक असून वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाचा जीव जाण्याचा धोका असतो.स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णावर लॅप्रोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात साचलेले मोठ्या प्रमाणातील रक्त ाहेर काढण्यात आले. तसेच फुटलेल्या नळीत असलेला गर्भ सुरक्षितपणे काढून रक्तस्त्राव थांविण्यात आला. भूलतज्ज्ञ, रक्तपेढी विभाग आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचार्यांच्या समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. वेळेवर योग्य निदान आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले.
महिला रुग्णावर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ.माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.वैभव पाटील, डॉ.प्राजक्ता पाटील, डॉ. ऐश्वर्या चलवदे यांनी यशस्वी उपचार केले.
वेळीच शस्त्रक्रिया केल्याने वाचला जीव
एटोपिक प्रेग्नन्सी ही गर्भधारणेतील गंभीर गुंतागुंत आहे. गर्भाशयाऐवजी गर्भ नळीत वाढल्यास नळी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. पोटदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसल्यास महिलांनी त्वरित डॉटरांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. या प्रकरणात योग्य वेळी रुग्णालयात दाखल झाल्याने आणि त्वरित शस्त्रक्रिया केल्याने महिलेचा जीव वाचविणे शय झाल्याचे डॉ.प्राजक्ता पाटील म्हणाल्या.