ईको कारच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंच्या पावडरची महाराष्ट्रात चोरी : मध्यप्रदेशातील टोळी पारोळा पोलिसांच्या जाळ्यात
पारोळा (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : ईको कारच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंच्या पावडरची महाराष्ट्रात येवून चोरी करणार्या मध्यप्रदेशातील टोळीला पारोळा पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान बेड्या ठोकल्या आहेत. आसीफ यामीन (22, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) व आरीफ सलीम (23, रा.अलीगड, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नाकाबंदीदरम्यान कारवाई
पारोळा पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील म्हसवे गावाजवळ वाहनाची तपासणी सुरू असताना मारुती सुझुकी कंपनीची निळ्या रंगाची वॅगन आर कार (डी.एन.3 सी.बी.यु.3358) ची तपासणी केली असता त्यात कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान घटकांची चोरी व अवैध व्यापार करणार्या संशयितांचा प्रकार उघडकीस आला. वाहनातून जुने वापरलेले ईको वाहनांचे तीन ग सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच त्यामधील अंदाजे सहा ‘सायलेंसर माती’ अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पावडर असा मुद्देमाल मिळून आला असून त्याची किंमत 50 हजार रुपये आहे. संशयित हे मारुती सुझुकी ईको वाहनांमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या पद्धतीने काढून त्यातील मौल्यवान घटकांची विक्री/व्यापार करीत असल्याचे समोर आले आहे.
कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे महत्त्व
वाहनाच्या इंजिनमधून बाहेर पडणार्या धुरामध्ये विविध विषारी वायू असतात. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधून हे वायू प्रक्रिया होऊन त्यातील घातक घटकांचे प्रमाण कमी केले जाते त्यामुळे वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यास कॅटॅलिटिक कन्व्हर्टर महत्त्वाची भूमिका बजावतो.
टोळीतील गुन्हे समोर येणार
राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या नाकाबंदी व वाहन तपासणीदरम्यान संशयास्पद वाहनाची बारकाईने तपासणीकरण्यात आल्याने हा आगळावेगळा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पारोळा पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त आणि सतर्क कारवाईमुळे चोरीच्या एका नवीन पद्धतीचा पर्दाफाश झाला. संशयितांकडून मुंबई व ठाणे परिसरात अशाच प्रकारच्या चोर्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली तर याबाबत गुन्हे नोंद आहेत अथवा नाहीत याची पडताळणी केली जात आहे.

