प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेरच्या पदवी अभ्यासक्रमात कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा अहिराणी अनुवाद ‘बा, तथागता !’ ची यशदायी निवड
एरंडोल (7 जुलै 2026) : शहरातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना. आंधळे यांनी मानवतावादी विचारवंत तथा कवी प्रा.डॉ.म.सु.पगारे लिखित मराठी बा,तथागता ! या अडीचशे पानी कवितेचे अहिराणी भाषेत केलेले भाषांतर ‘बा, तथागता (अहिराणी)’ प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथील तृतीय वर्ष कला या वर्गासाठी नेमण्यात आले आहे.
या साहित्यकृतीची निवड शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अध्ययन अध्यापनासाठी असून ही साहित्य कृती ‘भाषांतर मीमांसा (एम.आर.व्ही.एस.सी.367)’ या अभ्यास पत्रिकेत सहाव्या सत्रासाठी घेण्यात आली असल्याचे अभ्यास मंडळाचे पत्र प्रा.आंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. गेल्या चार दशकांपासून अव्याहत काव्य लेखन करणार्या प्रा.आंधळे यांच्या कविता महाराष्ट्राच्या प्राथमिक,उ च्च माध्यमिक शालेय शिक्षणापासून तर विविध विद्यापीठांच्याच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

इतकेच नाही तर गुजरात राज्य मराठी पाठ्यक्रम, कर्नाटक राज्य मराठी पाठ्यक्रम यामधून त्यांच्या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत. काव्य-लेखनासोबत संपादन, समीक्षा, ललित लेखन व अनुवाद या क्षेत्रातही त्यांची यशदायी वाटचाल सुरू आहे. त्यांच्या या यशाचे सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक स्तरांतून अभिनंदन होत आहे.