वेदांचेच रामायणात परिवर्तन ; ‘रामचरितमानस’ने वैदिक व पौराणिक विचारांना जोडले

भुसावळातील श्रीरामकथेत पूज्य मदन मोहनजी महाराजांचे प्रतिपादन ; श्रीराम-जानकी विवाहाचा सजीव देखावा


भुसावळ (11 जुलै 2026) : भारतीय जीवनपद्धतीचा मूलाधार वेद असून स्वतः वेदच रामायणाच्या रुपाने लोकांपर्यंत पोहोचले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. वैदिक आणि पौराणिक विचारधारांमध्ये सेतू निर्माण करण्याचे महान कार्य रामचरितमानसने केले आहे. रामायण ही आपल्या जीवनाची आदर्श मनुसंहिता असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात रामकथा समितीच्या पावन तत्त्वावधानात आयोजित सात दिवसीय श्रीरामकथेच्या चौथ्या दिवशी पूज्य मदन मोहनजी महाराज यांनी रामकथेचे निरूपण केले. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती, वेद आणि रामायण यांचे अनन्यसाधारण महत्त्व विषद केले.

रामायण आदर्श जीवन जगण्याचा मार्ग
कथेदरम्यान महाराजांनी वेदांचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीचे संपूर्ण तत्त्वज्ञान वेदांमध्ये सामावलेले असून, त्याच ज्ञानाचे सहज आणि लोकाभिमुख स्वरूप म्हणजे रामायण असल्याचे स्पष्ट केले. श्रीरामांचे चरित्र हे केवळ धार्मिक आख्यान नसून आदर्श जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्या उद्धारातून संयम व श्रद्धेचा संदेश
अहिल्या उद्धाराचा प्रसंग सांगताना महाराज म्हणाले की, जीवनात कितीही मोठे संकट किंवा दुःख आले तरी ते परमेश्वराचा प्रसाद समजून स्वीकारावे. प्रभूवर अखंड श्रद्धा ठेवून प्रेमपूर्वक त्यांची प्रतीक्षा करणार्‍या प्रत्येक भक्ताला जीवनात परमात्म्याची अनुभूती निश्चितच प्राप्त होते, असा संदेश त्यांनी दिला.

श्रीराम-जानकी विवाहाने भाविक झाले मंत्रमुग्ध
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि जगज्जननी माता जानकी यांच्या विवाहाचा प्रसंग कथन करताना संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. यावेळी श्रीराम-जानकी विवाहाचा सजीव देखावा सादर करण्यात आला. आकर्षक सजावट, मंगलमय वातावरण आणि पारंपरिक सादरीकरणामुळे उपस्थित भाविकांना प्रत्यक्ष विवाहसोहळ्याचा अनुभव मिळाला. या प्रसंगाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले.

भजनांच्या सुरांनी रंगली भक्तीची मैफल
कथेदरम्यान ‘चौक पुराओ, मंगल गाओ’ यांसह विविध रागांमधील भक्तिगीत आणि भजनांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. भजनांच्या सुरेल जुगलबंदीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि संपूर्ण परिसर श्रीरामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

मान्यवरांची उपस्थिती
प्रसंगी राधेश्याम लाहोटी, वीणा लाहोटी, जी.आर.ठाकूर, संजय चांडक, नगरसेवक परीक्षीत बर्‍हाटे, दीपाली बर्‍हाटे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रिया चौधरी, राजेंद्र आवटे, उमेश नेमाडे यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !