एटीएसच्या पथकाची राज्यात छापेमारी : भुसावळात तिघांची कसून चौकशी

जळगाव, धुळ्यासह नाशिकसह राज्यभरात 150 ठिकाणांवर छापे


गणेश वाघ
ATS team conducts raids across the state; three subjected to intensive questioning in Bhusawal भुसावळ (11 जुलै 2026) : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवार, 10 रोजी राज्यभरातील 150 हून जास्त ठिकाणांवर छापे टाकले. पाकिस्तानात बसून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देणारा आयएसआयचा हस्तक शहजाद भट्टीच्या राज्यातील नेटवर्कविरोधात ही कारवाई करण्यात आली. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूरसह राज्यभरातील विविध भागात पथक पहाटेच धडकले. दरम्यान, भुसावळ शहरातही पथक धडकल्यानंतर तीन तरुणांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली व नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सूत्रानुसार, धुळे जिल्ह्यात तीन तर जळगाव जिल्ह्यातून सहा तरुणांची चौकशी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

175 संशयीत शोधले
या मोहिमेत एटीएसने सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात असलेल्या 175 संशयितांना शोधून काढले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. एटीएसच्या 14 प्रादेशिक विभागातील 58 पथकांनी राज्यभरात शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून एकाच वेळी ही मोहीम राबवली. बंदी घातलेल्या मेसेजिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून भट्टीच्या संपर्कात आलेल्या या तरुणांचा शोध एटीएसने घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे सध्याचे लोकेशन, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या हालचाली तपासल्या जात आहेत. चौकशीनंतर अनेकांना सोडून दिले. तरुण पिढीचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविघातक कृत्यांकडे वळवण्याचा भट्टी नेटवर्कचा डाव या कारवाईमुळे उधळला आहे.

भुसावळात तिघांची चौकशी
भुसावळात आलेल्या पथकाने तीन तरुणांची कसून चौकशी केली. त्यात भुसावळातील एकाचा तर यावल व रावेर तालुक्यातील एका गावातील दोघांचा समावेश असल्याची माहिती आहे.

पोलिस प्रशासनाने बाळगले मौन
या संपूर्ण कारवाईबाबत एटीएस तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने कमालीची गोपनीयता पाळली असून कुठलीही माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

जळगावसह नाशिक, पुण्यातही छापे
दरम्यान, एटीएसने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 10 संशयितांची (वैजापूर 2, मिसारवाडी 3, हर्सूल 1, आरिफ कॉलनी 1, बायजीपुरा 1 व गंगापूर येथील 1 परप्रांतीय मजूर व अन्य भागातील 1 जण) चौकशी केली. तर जालन्यातील 2, धाराशिवमधील 2, बीडमधील एकाला ताब्यात घेतले. धुळ्यातून 3, जळगाव 6, अहिल्यानगर 7, मालेगाव व नाशिकमधून प्रत्येकी 4, नागपूर 4, चंद्रपूर 3, गोंदिया, गडचिरोली, वर्ध्यात प्रत्येकी 1 संशयित ताब्यात घेतला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सांगली व सातारा येथही छापे टाकले होते.

दिल्लीतील हल्ल्याच्या कटातून महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस
दिल्ली पोलिसांनी बुधवारी पंजाब व दिल्लीतून भट्टीच्या सहा दहशतवादी हस्तकांना अटक केली. त्यांनी दिल्लीत अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचल्याचे कबूल केले. यासाठी दानिश ऊर्फ चांद मियाँ याला 20 हजारांचे आमिष दिले होते. त्याचा साथीदार सलमानवर हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड पाकिस्तानात पाठवणार होता. या मॉड्यूलच्या तपासातून भट्टीचे नेटवर्क महाराष्ट्रातही सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ’दिव्य मराठी’ने ऑनलाईन या संदर्भातील वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !