नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत 28 वा प्रयोग यशस्वी : 700 विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद


जळगाव (सोमवार, 20 जुलै 2026) : नाट्यरंग जळगाव निर्मित, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि जीवनमूल्यांची जाणीव रुजवणारे लोकप्रिय बालनाट्य ‘गाठोड्याचं गुपित’ याचा 28 वा प्रयोग पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. संस्थेच्या पुढाकारातून हा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. शाळेतील सुमारे 700 विद्यार्थ्यांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली.

हे बालनाट्य केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार करणारे, जीवनातील सकारात्मक विचारांची जाणीव करून देणारे आणि अंतर्मूल्यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे माध्यम ठरत आहे. विचारप्रवर्तक कथानक, हृदयस्पर्शी मांडणी आणि प्रभावी सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांकडूनही या नाटकाला मोठी पसंती मिळत आहे.

राज्यस्तरीय विविध नाट्यस्पर्धांमध्ये अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन अमोल अरुण ठाकूर यांनी केले आहे. दर्जेदार आशय, प्रभावी अभिनय आणि सामाजिक संदेशामुळे ’गाठोड्याचं गुपित’चा यशस्वी प्रवास सातत्याने सुरू असून, शिरसोली येथील प्रयोगही विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात संस्मरणीय ठरला.

या नाटकात प्रभूदत्त दुसाने आणि राशी पडलवार या दोन प्रतिभावान बालकलावंतांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रंगमंच व्यवस्थेची धुरा प्रणित जाधव, पीयूष भुक्तार, प्रणव जाधव, अथर्व रंधे आणि दिशा ठाकूर यांनी समर्थपणे सांभाळली.

संस्थेचे संचालक निषादराज रंगराव बारी आणि अध्यक्षा श्रीमती भारती रंगराव बारी यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. कार्यक्रमानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती चौधरी यांनी संपूर्ण कलावंत व तांत्रिक टीमचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी अशा दर्जेदार उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !