फैजपूर पोलिसांची मोठी कामगिरी : 30 हजारांचे केळी घड चोरणार्‍या बामणोदच्या मुख्य संशयीताला बेड्या

चार संशयीतांचा सहभाग निष्पन्न : मुख्य संशयीताकडून 15 हजारांची रोकड जप्त


फैजपूर (मंगळवार, 1 ऑगस्ट 2026) : शेतकर्‍याच्या शेतातील केळीचे घड चोरी करणार्‍या मुख्य पसार आरोपीला फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. संशयीताकडून चोरीच्या केळी विक्रीतून मिळालेली 15 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई फैजपूर पोलिसांनी केली.

काय आहे प्रकरण ?
4 जुलै 2026 रोजी रात्री 7.08 वाजता शेतकरी जितेंद्र दिनकर कोळी (45, रा. त्रिमूर्ती चौक, फैजपूर, ता.यावल) यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिली होती. शेतकर्‍याच्या मौजे आमोदा गावाच्या शिवारातील शेत गट क्रमांक 205 मधील केळीच्या शेतातून सुमारे 30 हजार रुपये किंमतीचे 15 क्विंटल केळीचे घड अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते.
या प्रकरणात लहू अशोक केदारे, अजय सुनील केदारे, शुभम विजय केदारे आणि सुरज मिलिंद मोरे (सर्व रा. लुंबिनीनगर, बामणोद, ता. यावल) यांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी मुख्य संशयित लहू अशोक केदारे हा गुन्हा केल्यानंतर पसार होता.


फैजपूर येथून आवळल्या मुसक्या
पोलिसांनी लहू केदारेचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले. तो 27 ऑगस्ट 2026 रोजी फैजपूर शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेली केळी विकल्याचे सांगितले. त्याच्या वाट्याला आलेली 15 हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून आरोपीला न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रेडेडे पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार मोती पवार, हवालदार विकास सोनवणे, राहुल महाजन आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !