‘पूजा’ पडली महागात ! धावत्या रेल्वेत दिवा पेटवला : भुसावळात एमपीच्या प्रवाशाविरोधात गुन्हा
खुल्या ज्योतीमुळे दुर्घटनेचा धोका; मध्य प्रदेशातील प्रवाशाला ट्रेनमधून उतरवले
भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : धावत्या हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेसच्या आरक्षित बर्थवर दिवा पेटवून पूजा करणार्या प्रवाशाला रेल्वे प्रशासनाने भुसावळ स्थानकावर उतरवले. रेल्वेत खुली ज्योत पेटवण्यास मनाई असतानाही सूचना न पाळल्याने संबंधित प्रवाशाविरोधात रेल्वे अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आग लागून प्रवाशांच्या जीवितासह रेल्वेच्या मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
काय आहे प्रकरण ?
31 ऑगस्ट रोजी ट्रेन क्रमांक 12782 मधील ए-1 कोचच्या बर्थ क्रमांक 17 वर एक प्रवासी दिवा पेटवून पूजा करीत असल्याची माहिती भुसावळच्या वाणिज्यिक नियंत्रण कक्षाला मिळाली. ड्युटीवरील तिकीट तपासणी कर्मचारी रमन कुमार शर्मा (खंडवा) यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित टीटीईने प्रवाशाला दिवा तातडीने विझवण्याची सूचना केली. रेल्वेत खुली ज्योत वापरणे धोकादायक असून त्यातून आग लागण्याची शक्यता असल्याचेही त्याला समजावून सांगण्यात आले मात्र ‘प्रार्थना पूर्ण झाल्यानंतरच दिवा विझवणार’ असे सांगत प्रवाशाने सूचना पाळण्यास नकार दिला. टीटीईने या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून पुरावा जतन केला.

भुसावळ स्थानकावर प्रवाशाला उतरवले
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने संबंधित प्रवाशाला भुसावळ स्थानकावर ट्रेनमधून उतरवले. चौकशीत हा प्रवासी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरचा 55 वर्षीय रहिवासी असल्याचे समोर आले. त्याच्याकडून पितळी दिवा, माचिसची डबी आणि स्टीलचा डबा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 1 सप्टेंबर रोजी रेल्वे अधिनियम, 1989 मधील कलम 153 आणि 145 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 35 (क) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले.
प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन
मध्य रेल्वेने प्रवाशांना ट्रेनमध्ये ज्वलनशील वस्तू नेऊ नयेत तसेच दिवा, मेणबत्ती किंवा अगरबत्ती पेटवू नये, असे आवाहन केले आहे. रेल्वेतील अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


