संगीत ध्यान साधना व्यक्तिमत्व विकासाचे बहुविध पैलू विकसीत करण्याचे संसाधन : भुसावळात प्रा.डॉ.शलाका निकम
भुसावळ (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : ‘संगीत ध्यान साधना देश, धर्म, जात, निरपेक्ष असून संपूर्ण जगभर व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्यासाठी तिचा वापर केला जातो. संगीत हा विषय मनोरंजनासह रोजगार निर्मितीक्षम करणारा असून आर्थिक व मानसिकदृष्ट्या व्यक्तीला सक्षम करणारा विषय असल्याचे डॉ.शलाका निकम यांनी येथे अधोरेखित केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व भुसावळ कला, विज्ञान आणि पुनमचंद ओंकारदास नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अंतर्गत संगीत ध्यान साधना आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा.डॉ.निकम यांनी मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील होते. प्रमुख वक्ते संगीत विभाग प्रमुख डॉ.शलाका निकम होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विलास सोळुंके आणि बँकिंग विभाग प्रमुख डॉ. किरण वारके हे होते.

याप्रसंगी प्रा.डॉ.निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यक्तिमत्व ही बहुविध संकल्पना आहे मानसिकदृष्ट्या आनंदी आणि सक्षम होण्यासाठी संगीत ध्यान साधनेचा विद्यार्थिनींनी अवलंब करावा, ज्यातून ताण तणाव मर्यादित करता येऊ शकतो व कार्यक्षमतेत वाढ घडवून आणता येते’ असे प्रतिपादन डॉ.शलाका निकम यांनी केले.
उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील सर यांनी ’संगीत आणि मानवी जीवन यांचा संबंध खूप पुरातन असून मानवी जीवनात संगीताचा वापर वेगवेगळ्या प्रसंगी आवर्जून केला जात असल्याची सांगून संगीत थेरपीमुळे एक नवी उपचार पद्धती मानवाला उपलब्ध झाली’ असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विलास सोळुंके यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा पाटील हिने केले. पाहुण्यांचा परिचय कोमल पाटीले दिला तर आभार कुणाली कचवेहिने केले. यशस्वीतेसाठी गुणवंत पाटील, अक्षय चौधरी मानसी, प्रतीक्षा पवार, अनुष्का आंबेकर या विद्यार्थ्यांनी तसेच प्रा.डॉ.जितेंद्र आडोकार, प्रा.सुनील अडकमोल, प्रा. जोगेश्वरी पाटील आदींनी परिश्रम घेतले.

