विषारी दारूने ‘सागर’ हादरला ; 11 जणांचा मृत्यू, 35 जण रुग्णालयात
सागर, मध्यप्रदेश (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी अथवा अवैध दारूच्या सेवनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सुमारे 35 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गंभीर रुग्णांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय, सागर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दारू सेवन करणार्यांची तपासणी
रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांच्या शरीराचा रंग निळसर पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना अंगदुखीसह अन्य त्रास जाणवत असल्याची माहिती आहे. घटनेनंतर प्रशासनाने बाधित गावांमध्ये स्क्रीनिंग मोहीम सुरू केली असून, दारूचे सेवन केलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
लक्षणे जाणवल्यास तातडीने करावी तपासणी
जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गेल्या 24 ते 48 तासांत कोणत्याही प्रकारची दारू प्यायली असल्यास किंवा विषारी दारूशी संबंधित लक्षणे जाणवत असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी स्थानिक वैद्यकीय पथकाशी संपर्क साधावा किंवा थेट सिव्हिल रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहा दुकानांना ठोकले सील
घटनेनंतर प्रशासनाने कारवाईला वेग दिला असून, परिसरातील सहा दारू दुकाने सील करण्यात आली आहेत. या दुकानांमधून नमुने घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, अवैध दारू विक्री करणार्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री घुघर, नौराज, बराज आणि आसपासच्या परिसरातील काही नागरिकांनी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला. सध्या गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. वैद्यकीय पथकाकडून सर्व रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थितीनुसार आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
चार गावांतील नागरिकांचा समावेश
प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये चार गावांतील नागरिकांचा समावेश आहे. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरू असून, मृत्यू नेमके कोणत्या कारणामुळे झाले याचा तपास केला जात आहे. दारूच्या सेवनामुळे ही घटना घडली का, तसेच अवैध दारूचा यात संबंध आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.

