शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ : गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

800 विद्यार्थ्यांसह 400 कुटुंबांना अल्पदरात मिळणार शुद्ध पाणी


जळगाव (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून शिरसोली प्र.बो. येथे ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या माधुरी केला व त्यांच्या कन्या मिहिका केला यांच्याहस्ते या योजनेचे उद्घाटन मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते सुमित संघाई, माधुरी केला यांच्या दातृत्वातून हा उपक्रम साकारला आहे.

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे 800 विद्यार्थी तसेच परिसरातील 400 कुटुंबे आणि ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. ‘जीवनधारा’ योजनेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 500 लिटर शुद्ध पेयजल उपलब्ध होणार असून ते अत्यल्प दरात ग्रामस्थांना मिळणार आहे.

ग्रामीण भागात शुद्ध पेयजलाची उपलब्धता ही आजही मोठी गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन कु. मिहिका केला यांनी ‘जीवनधारा’ योजनेची संकल्पना आणि आवश्यकता मांडली. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशनच्या तांत्रिक सहकार्याने ही योजना प्रत्यक्षात साकारली.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विवेकानंद शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मिहिका केला यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचे आवाहन केले.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या मार्गदर्शक अंबिका जैन यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ गांधीवादी अब्दुलभाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुद्ध पाणी आणि आरोग्य यांचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षकांनीही शुद्ध पेयजलाचा नियमित वापर करून आरोग्य जपण्याचे आवाहन केले. शिरसोली गावाची या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल दातृत्ववान मान्यवरांचे आभार व्यक्त केले. ‘जीवनधारा’ योजनेमुळे ग्रामस्थांना कमी खर्चात शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्यामुळे होणारे विविध आजार आणि साथीच्या रोगांना आळा बसण्यास मदत होईल. या शुद्ध पेयजल सयंत्राचे व्यवस्थापन विवेकानंद शाळेचे संचालक व शिक्षकवृंद करणार आहेत.

यांची होती उपस्थिती
यावेळी जैन इरिगेशनचे जलतंत्रज्ञ अभिजीत जोशी, सुनील कोठाळकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आभार गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार, सुधीर पाटील तसेच विवेकानंद शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !