भुसावळ उपविभाग पोलिसांतर्फे ‘गणराया वॉर्ड 2026’ स्पर्धेचे आयोजन

सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, शिस्त व सुरक्षित गणेशोत्सवाला प्रोत्साहन


भुसावळ (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि कायदा-सुव्यवस्थेची जोड देण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘गणराया वॉर्ड 2026’ या विशेष सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ उपविभागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी केले आहे.

पर्यावरण गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन
या स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाचे पावित्र्य जपत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

सुरक्षा आणि दर्शन व्यवस्था ठरणार महत्त्वाची
स्पर्धेसाठी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, बॅरिकेडिंग, स्वयंसेवकांची व्यवस्था तसेच अग्निशामक यंत्रणा यांचा विचार केला जाणार आहे. दर्शन रांगेचे नियोजन आणि गर्दी नियंत्रणालाही महत्त्व दिले जाणार आहे.

स्वच्छता, पर्यावरण संवर्धनावर भर
मंडप व परिसरातील नियमित स्वच्छता, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या उपाययोजनांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि उत्सव पद्धतीला प्राधान्य दिले जाणार आहे.

सामाजिक उपक्रमांनाही गुणांकन
रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, सायबर सुरक्षा जनजागृती, सामाजिक सलोखा आणि समाजप्रबोधनासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचाही स्पर्धेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे.

वेळेचे व कायद्याचे पालन आवश्यक
आरती व मिरवणुकीदरम्यान निर्धारित वेळेचे पालन, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मंडळांकडून करण्यात येणारे सहकार्य, ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य तसेच पोलिस व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन या बाबींनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

तीन गटांत होणार स्पर्धा
‘गणराया वॉर्ड 2026’ स्पर्धेसाठी भुसावळ उपविभागातील मंडळांचे तीन गट करण्यात आले आहेत.

पहिला गट- भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस ठाणे (एकत्रीत)
दुसरा गट- नशिराबाद पोलीस ठाणे
तिसरा गट- भुसावळ तालुका पोलीस ठाणे

प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची मुख्य पारितोषिके तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.

स्पर्धेत सहभागाचे आवाहन
प्रतिष्ठित व्यक्तींची स्वतंत्र परीक्षण समिती
स्पर्धेचे मूल्यमापन निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व मान्यवर व्यक्तींची स्वतंत्र परीक्षण समिती गठित करण्यात आली असून मंडळांच्या विविध उपक्रमांचे वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षण होणार आहे. उत्सवाचे पावित्र्य, सामाजिक सलोखा आणि कायद्याचा सन्मान राखत आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘गणराया वॉर्ड 2026’ मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

 

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !