पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेला भुसावळात उत्स्फूर्त प्रतिसाद
200 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ; ‘निसर्ग वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश
भुसावळ (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित), नंदनवन केंद्र भुसावळ येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्माण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक)चे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशाने व आशीर्वादाने हा उपक्रम राबविण्यात आला.
‘निसर्ग वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्यामध्ये संस्कार, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश या कार्यशाळेमागे होता.
या प्रशिक्षण कार्यशाळेत भुसावळ शहर तसेच ग्रामीण भागातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून आपल्या कलाकृती सादर केल्या.
कार्यशाळेत खिरोदा आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य प्रा.अतुल मंगेश मालखेडे व सोनिच्छा ड्राईंग क्लासच्या संचालक जयश्री किशोर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ भुसावळ केंद्रातील सेवेकर्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणार्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. भुसावळ शहर श्री स्वामी समर्थ केंद्रप्रमुख पूनम कोल्हे यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

