उजेड पेरणारी माणसं : माणुसकीच्या उजेडाचा कृतज्ञ दस्तऐवज
देवा झिंजाड, पुणे
भुसावळ (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : साहित्य म्हणजे मानवी संवेदनांचा आणि अनुभवांचा एक प्रवाही झरा असतो. मराठी साहित्यात पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या दिग्गज लेखकांनी आपल्या लेखणीतून माणसांमधील ’माणूस’ शोधण्याचे आणि त्याचे प्रभावी व्यक्तिचित्रण करण्याचे कार्य केले. तोच वारसा पुढे नेत, पत्रकारितेच्या धबडग्यातून गवसलेली रत्ने लेखक आनंदा लोटन पाटील यांनी ’उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहेत.
‘कृतज्ञ दस्तऐवज’
कोरोनासारख्या भीषण अंधारात ज्यांनी माणुसकीचा नंदादीप तेवत ठेवला, अशा ऋषीवंतांच्या जगण्याचा हा ‘कृतज्ञ दस्तऐवज’ आहे.
आनंदा स्वतः एक अनुभवी पत्रकार असल्याने समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत सूक्ष्म आणि सर्वसमावेशक आहे. समाजातील चांगले-वाईट, संघर्षाची दाहकता आणि यशाचा आनंद हे सर्व पैलू त्यांनी अत्यंत जवळून अनुभवले आहेत. एका पत्रकाराची तटस्थता आणि एका लेखकाची संवेदनशीलता यांचा हा एक दुर्मिळ संगम आहे.
84 व्यक्तींची व्यक्तिचित्रणे
पुस्तकात एकूण 84 व्यक्तींची व्यक्तिचित्रणे आहेत, त्यात प्रतापसिंग बोदडे, हे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या चळवळीतील एक समर्पित भीमशाहीर, ज्यांनी आयुष्यभर समतेची गाणी गायली. त्यांच्याविषयीचा लेख असेल किंवा जितेंद्र सुरळकर (पिसुर्वो) प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जागतिक स्तरावर ’क्युबिझम’ शैलीत स्वतःची ओळख निर्माण करणारे ध्येयनिष्ठ चित्रकार असतील. अशी अनेक माणसं त्यांनी शोधून त्यांच्यावर लिहिलं आहे.
सारंग पवार ह्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गीतांतून समता आणि न्यायाची मूल्ये रुजवणारे प्रबोधन केले आहे. तसेच अरुण नारखेडे ह्यांनी सामूहिक हत्याकांडाच्या खोट्या खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर 10 वर्षांच्या तुरुंगवासातील अनुभवातून घडलेला एक ’वाङ्मयनिर्माता उद्योजक’ ह्यांचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
सीमा भारंबे ह्या भगिनी महिलांच्या प्रश्नांवर लढणार्या बंडखोर स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या, ज्यांनी ‘स्व’चा शोध घेणार्या स्त्रियांचे चित्रण केले त्यांच्याही कार्याचा यथोचित आढावा ह्यात वाचायला मिळतो.
या पुस्तकाची प्रमुख बलस्थाने म्हणजे याची ’अतिशय साधी आणि सोपी भाषा’. लेखकाने अलंकारिक भाषेचा वापर करतानाही कुठेही क्लिष्टता येऊ दिली नाही. त्यांची मांडणी प्रवाही असून, वाचकाला एका व्यक्तीरेखे कडून दुसर्याकडे अलगद घेऊन जाते. ही व्यक्तिचित्रणे वाचताना त्यातील पात्रांचा संघर्ष आणि माणुसकीची ऊब थेट काळजाला भिडते.
आजच्या काळात व्यक्तिचित्रणाची मोठी गरज आहे. केवळ महान नेत्यांची चरित्रे वाचण्यापेक्षा, आपल्या अवतीभवती राहून शांतपणे विधायक कार्य करणार्या या ’दीपस्तंभांची’ ओळख नव्या पिढीला होणे आवश्यक आहे. ही माणसे अंधार जाळून उजेड पेरणारी आहेत आणि त्यांचे कार्य समाजापुढे आणणे हे सामाजिक बांधिलकीचे लक्षण आहे.
एकंदरीत, आनंदा लोटन पाटील यांनी पत्रकारितेच्या अनुभवातून मांडलेला हा शब्दप्रवास वाचकांच्या मनाला समृद्ध करणारा आहेच परंतु या उजेड पेरणार्या माणसांच्या कथा वाचकांना जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा नक्कीच देतील. समाजासमोर आदर्श म्हणून उभी असलेली अनेक माणसं पुढं येतील असा आशावाद वाटतो. उजेड पेरणार्या माणसांना उजेडात आणुन आनंदा ह्यांनी फार महत्वाचे कार्य केले आहे म्हणून ह्या पुस्तकास आणि लेखकास पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा!

