खडकदेवळा येथे धाडसी घरफोडी : तीन लाखांचा ऐवज लंपास
पाचोरा (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून तीन लाख 10 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
तक्रारदार शांताराम भानुदास तेली (48, खडकदेवळा बु.॥, ता. पाचोरा, जि. जळगाव) हे 5 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तत्काळ पाचोरा पोलिसात तक्रार दाखल केली.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरीला
चोरीस गेलेल्या मुद्देमालात दोन वाट्यांसह चार मणी असलेले सुमारे 2.970 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5.010 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 5.930 ग्रॅम वजनाची सोन्याची कान चैन, 5.940 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, 14.8 ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन पायजोडवे, 30.790 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मंगलपोत आणि 0.240 ग्रॅम वजनाची सोन्याची कामणी यांचा समावेश आहे. याशिवाय 30 हजारांची रोकड मिळून तीन लाख 10 हजार 200 रुपयांचा ऐवज असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

