पिंप्रीकरांचा एकोपा ग्रामविकासासाठी आदर्श : चिंतनभाई पटेल
‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमातून सामाजिक सलोख्याचा संदेश ; नगराध्यक्षांच्या हस्ते आरती
जयपालसिंह गिरासे
शिरपूर (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : शिरपूर तालुक्यातील पिंप्री गावाने सामाजिक एकोपा, शांतता आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे तसेच सन 2011 मध्ये तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळणे, ही पिंप्रीकरांच्या एकजुटीची उदाहरणे आहेत. अशा आदर्श गावात ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून विराजमान झालेल्या गणरायाची आरती करण्याचे सौभाग्य लाभले, याचा विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले.
नगराध्यक्षांच्या हस्ते आरती
पिंप्री येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा प्रथमच ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंडळाचे हे प्रथम वर्ष असतानाही विविध मान्यवरांनी आरतीचा मान स्वीकारला आहे. शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या आरतीचा मान शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. यावेळी थाळनेरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील आणि सावळदेचे सरपंच सचिन राजपूत यांनीही गणरायाची आरती केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी थाळनेरचे महेंद्र बाविस्कर, राकेश पाटील, रवि तंवर, आमोद्याचे माजी सरपंच राज देशमुख, भाजपा शिरपूर तालुका युवा अध्यक्ष संदीप कुंवर, पिंप्रीचे सरपंच महेंद्र सिसोदिया, पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे, माजी सरपंच प्रविण राजपूत, आर.डी. पाटील, वासुदेव गिरासे, संजय धनगर, माजी सरपंच किशोर पाटील, भारत राजपूत, जितेंद्र कोळी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन युवराज धनगर, ग्रामपंचायत सदस्य रणजित इंद्रसिंग सिसोदिया यांच्यासह युवा प्रतिष्ठान पिंप्रीचे मनोज राजपूत, स्वप्निल राजपूत, अनिल गिरासे, रितेश राजपूत, राज गिरासे, राकेश गिरासे, लवेन पवार, योगेश गिरासे, प्रमोद गिरासे, हरीश राजपूत, नरेश कोळी, प्रतिक राजपूत तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी पंडितसिंग राजपूत, प्रल्हादसिंग राजपूत, महेंद्र गिरासे, गोटूनाना राजपूत, भुरा राजपूत आदी उपस्थित होते.
एकीचा संदेश देणारी संकल्पना
सरपंच महेंद्र सिसोदिया म्हणाले, एक गाव, एक गणपती ही संकल्पना गावाच्या एकजुटीचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे. या उपक्रमामुळे गावातील सर्व समाजघटक एकत्र येऊन बंधुभावाची भावना अधिक दृढ होत आहे. ग्रामविकासासाठी अशीच एकजूट आणि सामूहिक सहभाग कायम राहावा, हीच अपेक्षा आहे.
शिस्त, शांतता आणि सामाजिक बांधिलकीची जोड
पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे म्हणाले, एक गाव, एक गणपतीमुळे उत्सवाला भक्तीबरोबरच शिस्त, शांतता आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळते. गणेशोत्सव शांततेत, आनंदात आणि सर्वांच्या सहभागाने साजरा करणे हीच खरी परंपरा आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे.
ही तर गावाला एकत्र आणणारी चळवळ
मंडळाचे अध्यक्ष मनोज राजपूत म्हणाले, एक गाव, एक गणपती ही केवळ गणेशोत्सवाची संकल्पना नसून गावाला एकत्र आणणारी चळवळ आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने धार्मिक उत्सवासोबत सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकी, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपत हा उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
यशस्वीतेसाठी युवा प्रतिष्ठान, एकता नवयुवक मित्र मंडळ आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



