मलकापूरमध्ये भीषण तिहेरी अपघात ! अंबाबाईचे दर्शन घेऊन परतणार्या चौघा युवकाचा युवकांचा मृत्यू ; तिघे गंभीर
मलकापूर (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : कोल्हापूर येथील अंबाबाईचे दर्शन घेऊन गावी परतणार्या सात युवकांच्या कारचा पुणे-बंगळुरू महामार्गावरील युनिक उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. ट्रकला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारची छोटा हत्ती वाहनालाही धडक बसली. या तिहेरी अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता यादव आर्केडसमोर ही दुर्घटना घडली. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मृतांमध्ये 20 ते 25 वयोगटातील युवकांचा समावेश
या अपघातात तेजस तानाजी देशमुख (25), सागर जालिंदर निंबाळकर (23), सुयश शशिकांत चिंचकर (20) आणि रोहित दादासाहेब धोत्रे (21) या चार युवकांचा मृत्यू झाला तर ऋतुराज दुबळे (21), शंतनू शिंगाडे (20) आणि अमन तांबोळी (23) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी झालेले सर्व युवक सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.





दर्शनाहून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव येथील सात युवक दसर्याच्या निमित्ताने कारने (एम.एच.11 डी.एच.8361) कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रात्रीच्या सुमारास आपल्या गावी परतत होते. दरम्यान, रात्री सुमारे 11 वाजता त्यांची कार मलकापूर येथील पुणे-बंगळुरू महामार्गाच्या नवीन सहापदरी उड्डाणपुलावरून जात असताना यादव आर्केडसमोर सातारच्या दिशेने जाणार्या ट्रकला पाठीमागून धडकली. धडकेनंतर कार गोल फिरली आणि पाठीमागून येणार्या छोटा हत्ती वाहनावर आदळली.
कारचा चुराडा ; चौघांचा जागीच मृत्यू
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तिचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस आणि शहर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी तिघांवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नव्या युनिक उड्डाणपुलावरील पहिलाच भीषण अपघात
मलकापूर येथील युनिक उड्डाणपूल काही महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या नव्या सहापदरी उड्डाणपुलावर घडलेला हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.दसर्यानिमित्त देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणार्या युवकांवर काळाने घाला घातल्याने कातरखटाव गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
