17 गुन्हे दाखल असलेला अट्टल आरोपीसह चोपड्यातील दोघे नंदुरबार गुन्हे शाखेच्या जाळ्यात
दोन गुन्ह्यांची उकल : 47 हजारांचा मुद्देमाल यंत्रणेकडून जप्त
नंदुरबार (गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026) : नंदुरबार शहरातील घरफोडी व चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. प्रवीण लोटन कोळी (सुटकार, ता.चोपडा) व राहुल उर्फ भावशा बळीराम बाविस्कर (रा.सुटकार, ता.चोपडा, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
18 ते 19 सप्टेंबर दरम्यान नंदुरबार शहरातील प्लॉट क्रमांक 41 ब, योगेश्वर कॉलनी, नवळा रोड परिसरात घरफोडीची घटना घडली होती. लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना हा गुन्हा चोपडा तालुक्यातील सराईत गुन्हेगार प्रवीण लोटन कोळी याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. बुधवार, 21 ऑक्टोबर 2026 रोजी चोपडा शहरातून संशयित प्रवीण लोटन कोळी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दोन मोबाईल फोन काढून दिले. त्यातील एक मोबाईल नंदुरबार येथून चोरी केल्याची माहिती समोर आली. तसेच चोरीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्याचे संशयीत राहुल उर्फ भावशा बळीराम बाविस्कर (रा.सुटकार, ता.चोपडा, जि.जळगाव) कडे दिल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली मात्र चौकशीत आरोपीने कुठलीही माहिती दिली नाही.

दोन मोबाईलसह दुचाकी जप्त
संशयीत राहुल उर्फ भावशा बळीराम बाविस्कर याच्या ताब्यातील दुचाकी ही नंदुरबार शहरातून 15 ते 20 दिवसांपूर्वी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे तर 22 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर प्रवीण लोटन कोळी (सुटकार, ता.चोपडा) विरोधात तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. आरोपींना अधिक तपासार्थ उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हवालदार योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, अंमलदार राहुल पांढारकर, अभय राजपूत, विनोद पाटील, रोहिणी धनगर आदींच्या पथकाने केली.
