भुसावळात 35 वर्षीय महिलेचा विनयभंग : वाद सोडवणार्‍या प्रौढावर चाकूहल्ला

सोनसाखळी हिसकावली : देवेंद्र उर्फ डेव्हिड अशोक सरवटकरविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल


भुसावळ (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : शहराजवळील झेडटीसी साळवे नगर, फेकरी परिसरातील 35 वषीृय महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत तिचा विनयभंग करण्यात आला तसेच महिलेची सोनसाखळी जबरीने हिसकावून वादात मध्यस्थी करणार्‍यावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रकार 21 ऑक्टोबर रोजी घडला. याप्रकरणी देवेंद्र उर्फ डेव्हिड अशोक सरवटकर याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
35 वर्षीय पीडिता आपल्या सासूसह झेडटीसी परिसरात वास्तव्याला सून त्याच भागात संशयीत राहतो. बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आरोपी दारूच्या नशेत घराच्या प्रवेशद्वारासमोर उभा राहून अश्लील शिवीगाळ करत होता. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता हातात धारदार चाकू घेऊन तो थेट महिलेच्या घरात घुसला. यावेळी आरोपीने महिलेचा विनयभंग केला व महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने चाकूने वार केले. त्यात महिलेच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि दंडाला दुखापत झाली. महिलेची आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे संतोष गणेश नवगिरे (47) हे मदतीसाठी धावून आल्यानंतर आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करून गालावर वार केले. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून घेत आरोपीने पळ काढला. जाताना ‘अब दुबारा ये सोने की चैन मुझे मंगना नहीं’ असे म्हटल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.

पूर्वीही धमकी दिल्याचा आरोप
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही आरोपीने दारूच्या नशेत येऊन चाकूसारखे हत्यार दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळीही तक्रार देण्यात आली होती. या घटनेनंतर भयभीत झालेल्या कुटुंबाने घर बंद करून घेतले आणि दुसर्‍या दिवशी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी देवेंद्र उर्फ डेव्हिड अशोक सरवटकर याच्याविरुद्ध घरात अनधिकृत प्रवेश, विनयभंग, दुखापत, चोरी आणि जीवे मारण्याची धमकी यांसह संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !