पाचोर्यात धूम स्टाईल चोरट्यांनी सोनसाखळी लांबवली
पाचोरा (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : ड्युटीवरून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील दत्त मंदिराजवळ मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.35 वाजेच्या सुमारास घडली. एक तोळा वजनाची सुमारे 75 हजार रुपये किंमतीची पोत चोरून नेल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले शहरात ?
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सीमा प्रवीण पाटील (50, रा. पुजारी नगर, भडगाव रोड, पाचोरा) या ड्युटीवरून घरी जात असताना लाल रंगाच्या क्रमांक नसलेल्या रॉयल एनफिल्ड हंटर दुचाकीवरून दोन जण त्यांच्या मागून आले. मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली आणि दोघेही पसार झाले. महिलेने आरडा-ओरड करेपर्यंत चोरटे क्षणात पसार झाले. पोलिसांना माहिती कळवल्यांनतर त्यांनी धाव घेत पाहणी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला.







