पारोळा रथोत्सवात महिलांच्या दागिन्यांची चोरी : बीडमधील चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
सहा लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : आठ दिवस पथकाने ठाण मांडत आवळल्या मुसक्या
जळगाव (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : पारोळा येथील रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या चेन चोरी करणार्या बीड जिल्ह्यातील आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गणेश कचरू पवार (40, रा.अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी एकूण सहा लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेच्या सुमारास पारोळा शहरातील लवण गल्लीतील महेंद्र फोटो स्टुडीओसमोर गर्दीचा फायदा घेत तीन ते चार चोरट्यांनी तक्रारदाराच्या अंगावरील दागिने बळजबरीने हिसकावले होते. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेकडून समांतर तपासात आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने बीड गाठले व आठ दिवस तळ ठोकून आरोपी गणेश कचरू पवार (40, रा.अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) यास अटक केली.








सहा लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत पोलिसांनी 13 ग्रॅमची सोन्याची चैन, 17 ग्रॅमची फॅन्सी सोन्याची चैन, 17 ग्रॅमची गोफ मिळून एकूण 47 ग्रॅम वजनाचे व बाजारभावानुसार सहा लाख 11 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस कर्मचारी हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील तसेच चालक रिजवान शेख आदींच्या पथकाने केली.