अवैध वाळू वाहतूक पोलिसांच्या रडारवर : पाच स्वतंत्र कारवायांमध्ये 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

सात आरोपींविरोधात गुन्हे : जळगाव तालुका हद्दीत तीन तर भडगावसह नशिराबाद हद्दीत प्रत्येकी एक कारवाई


जळगाव (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण पाच गुन्हे दाखल करून सात आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन डंपर, दोन ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण 50 लाख 10 हजार 026 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष पथक तयार करून कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांनी माहिती संकलित करून कारवाई सुरू केली.









पाच गुन्ह्यात सात आरोपींवर कारवाई
बुधवार, 4 नोव्हेंबर रोजी भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. भडगाव पोलिसांनी दोन गुन्ह्यांत दोन आरोपींवर कारवाई करत 12 ब्रास वाळू व दोन डंपर मिळून 41 लाख 31 हजार 566 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नशिराबाद पोलिसांनी एका गुन्ह्यात दोन आरोपींवर कारवाई करून तीन ब्रास वाळू व डंपर मिळून तीन लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई
जळगाव तालुका पोलिसांनी तीन गुन्ह्यांत तीन आरोपींवर कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले.

पहिल्या कारवाईत खेडी खुर्द गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. दोन लाख 24 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दुसरी कारवाई फुफनगरी गावाच्या नदीपात्राकडून खेडी खुर्दकडे जाणार्‍या रस्त्यावर करण्यात आली. ट्रॅक्टरमध्ये तीन ते चार घमेले वाळू आढळल्याने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसरी कारवाई याच रस्त्यावर करण्यात आली व एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. दोन लाख 24 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 50 लाख 90 हजार 26 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटील, भडगावचे पोलीस निरीक्षक महेश टाक व नशिराबाद प्रभारी योगिता नारखेडे व त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचार्‍यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !