सात गावठी कट्टे, 46 जिवंत काडतूसांसह आंतरराज्यीय टोळी नंदुरबार गुन्हे शाखेच्या जाळ्यात

मध्यप्रदेशातील उमर्टी पुन्हा चर्चेत : 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त ; तस्करांच्या तंबूत कारवाईने खळबळ


गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींकडून तब्बल सात गावठी कट्टे, 46 जिवंत काडतूस तसेच सात लाख रुपये किंमतीची वाहने, दिड लाखांचे मोबाईल असा एकूण 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील पृथ्वीराज उर्फ गोलू हा मध्यप्रदेशातून कट्टे आणून त्याची महाराष्ट्रातील धुळ्यासह जळगाव, अहिल्यानगर, पुणे व गुजरात राज्यात तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना खातरजमा करून कारवाईचे निर्देश दिले.









सुरूवातीला दोघांच्या शस्त्रांसह आवळल्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पृथ्वीराज उर्फ गोलू याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. 29 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12.30 वाजता म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल भूषणजवळ सापळा रचला. यावेळी संशयीत पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कारने मध्यप्रदेशातून म्हसावद मार्गे येताच त्यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी संशयीत पृथ्वीराजसिंग उर्फ गोलू रणजीतसिंग जाधव (26, रा. शिक्षक कॉलनी, सारंगखेडा, ता.शहादा) व महेश भाईदास कोळी (26, रा.तर्‍हाडी, ता.शहादा) यास ताब्यात घेण्यात आले.

गावठी कट्टा व काडतूस
वाहनाची तपासणी केली असता डॅशबोर्डच्या बाजूला असलेल्या सिटच्या खाली 25 हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा आणि सहा हजार रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे आढळल्याने ती जप्त करण्यात आली तसेच सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे स्विफ्ट वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा उलगडा : संशयीत धुळ्यासह सुरत, सेंधवाचे रहिवासी
पकडण्यात आलेल्या पृथ्वीराज ऊर्फ गोलू याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मध्य प्रदेशातून गावठी बनावटीचे कट्टे आणून महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यांसह गुजरात राज्यात विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची व्याप्ती वाढवली. आरोपीने आतापर्यंत अनेकांना गावठी शस्त्र पुरवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी साखळीतील अन्य पाच आरोपींच्या मुसक्या बांधल्या

या आरोपींवरही कारवाई : कट्टे व काडतूस जप्त
पोलिसांनी भाविन गणेशभाई वरिया (26, रा. प्लॉट नं. 35, मनीषा सोसायटी, साईपूजन, जुना कोसाड रोड, चौरसी, सुरत, गुजरात) याच्या ताब्यातून दोन कट्टे, ब्रिजेशभाई सतीशभाई जानी (37, रा. कर्मचारी नगर, डेेडियापाडा, जि.नर्मदा, गुजरात) याच्या ताब्यातून एक कट्टा व 39 काडतूस, राहुल वाल्मिक सूर्यवंशी (चौधरी) (26, रा. प्लॉट नं. 243/7, देवपूर बसस्थानकासमोर, दुर्गामाता मंदिराजवळ, धुळे) याच्या ताब्यातून एक कट्टा व दोन काडतूस, जयेश निंबा पाटील (राजपूत) (30, रा.सारंगखेडा, ता.शहादा, जि.नंदुरबार, हल्ली मुक्काम अशोकनगर, सातपूर, नाशिक) यांच्या घरातून एक कट्टा तसेच एक पसार आरोपीच्या घरातून एक कट्टा व दोन जिवंत काडतूस असा एकूण चार लाख 55 हजार रुपये किंमतीचे सात देशी कट्टे व 92 हजार रुपये किंमतीचे 46 जिवंत काडतूस, सात लाखांची वाहने, दिड लाखांचे मोबाईल असा एकूण 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्ह्यात मदत करणार्‍यांनाही अटक
दरम्यान, या टोळीतील गावठी कट्टे व जिवंत काडतुसे खरेदी-विक्री करण्यासाठी मदत करणारे तसेच प्रत्यक्ष सहभाग असलेले पुढील पाच आरोपीही तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. गोपाल उर्फ सागर हिरामण ठाकरे (28, रा.हनुमान मंदिराजवळ, डोंगरगाव, ता. शहादा), राहुल सुरेश मोरे (21, रा.खेडदीघर, ता.शहादा), लकी उर्फ कमलेश संजय पाटील (19, रा. वॉर्ड क्रमांक सात, शेवटची गल्ली, धानक मोहल्ला, पानसेमल, जि. बडवाणी, मध्य प्रदेश), भूषण राजू चौधरी (26, रा.नाथ गल्ली, खलवाडी मोहल्ला, सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश), हरीष उर्फ सन्नी कैलास चौधरी (24, देवपूर बसस्थानकासमोर, दुर्गामाता मंदिराजवळ, धुळे) यांना अटक करण्यात आली तर गुन्ह्यातील इतर पसार साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे मध्य प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू असलेल्या अवैध अग्निशस्त्र तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, दिनेश वसुले, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, भरत उगले, विनोद पाटील, हेमंत बारी, रामेश्वर चव्हाण, रवींद्र अहिरे आणि रोहिणी धनगर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !