दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या ; जामनेरातील प्रकार
जामनेर (गुरुवार, 12 नोव्हेंबर 2026) : शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या पर्समधील सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबवल्या. बांगड्याची किंमत एक लाख 84 हजार रुपये असून, याप्रकरणी रविवारी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित महिला आपल्या सुनेसह बांगड्यांचा आकार मोठा करण्यासाठी सराफ बाजारात जात होती. वाटेत ओळखीचे सराफ भेटल्याने त्यांनी बांगड्यांबाबत विचारणा केली आणि अर्ध्या तासाने येतो, असे महिलेने सांगितले. त्यानंतर सासू-सुनेने बाजारपेठेतून फुले, पणत्या व झाडू खरेदी केले आणि त्यासाठी मोठ्या पर्समधून पैसे दिले. याच पर्समध्ये ठेवून दिलेल्या लहान पर्समध्ये सहा तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या होत्या.








खरेदीनंतर सराफ बाजाराकडे जात असताना गांधी चौकातील लस्सी सेंटरसमोर महिलेला पर्सची चेन अर्धी उघडी असल्याचे निदर्शनास आले. तिने पर्स तपासून पाहिली असता, आतील लहान पर्स व त्यातील सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार बाळू भोई करीत आहेत.