परळीच्या मंचावर सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा ; ‘इडा-पिडा जाऊ दे, भाऊ माझा मंत्री होऊ दे’ विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा


परळी (गुरुवार, 12 नोव्हेंबर 2026) : राजकीय विरोधकांवर आपल्या आक्रमक शैलीत टीका करणार्‍या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परळीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहत अंधारे यांनी त्यांना थेट मंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या. ‘इडा-पिडा जाऊ दे आणि भावाचं राज्य येऊ दे, भाऊ माझा मंत्री होऊ दे’ या त्यांच्या अनोख्या शुभेच्छांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

धनंजय मुंडेंच्या लोकप्रियतेचे केले कौतुक
परळीमध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात सुषमा अंधारे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. यावेळी अंधारे यांनी मुंडे यांच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत त्यांच्या मतदारसंघातील जनसंपर्काचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, तुम्ही अडीच तास उशिरा आलात, तरीही ही माणसं इथे थांबली आहेत, हे याचंच प्रमाण आहे की पदं येतील आणि जातील, पण तुमची लोकांमधील क्रेझ कायम आहे. अर्थात तुम्हाला ’माजी’ म्हणायला आमच्या जीवावर आताही येतंय. देव करो आणि पुढच्या दिवाळीला आम्ही तुमचा उल्लेख ’माजी’ म्हणून अजिबात करू नये.








‘इडा-पिडा जाऊ दे आणि भावाचं राज्य येऊ दे’
दिवाळीच्या पारंपरिक शुभेच्छांचा संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी खास शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, परळीला कायम सत्ता केंद्रासोबत ठेवायची सवय आहे, त्यामुळे केंद्र आपल्यासोबत असलं पाहिजे. जिथं आपण दिवाळीत ’इडा-पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे’ म्हणतो, परंतु माझ्यासारख्या बहिणीला कायम लक्षात राहील आणि आजच्या दिवशी भाऊ, तुम्हाला या खास शुभेच्छा असतील आमच्याकडून की, ’इडा-पिडा जाऊ दे आणि भावाचं राज्य येऊ दे. भाऊ माझा मंत्री होऊ दे, भावाला माझं सुख लाभू दे.

राजकीय समीकरणांच्या चर्चेला नवा विषय
सुषमा अंधारे या विरोधकांवर परखड टीका करणार्‍या नेत्या म्हणून परिचित आहेत. विशेषतः महायुतीतील नेत्यांवर त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्याबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एका बाजूला राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षांतील नेत्यांची एकाच मंचावरील उपस्थिती आणि दुसरीकडे मंत्रीपदासाठी दिलेल्या शुभेच्छा, यामुळे या विधानाचे राजकीय अर्थ लावले जात आहेत मात्र या वक्तव्यावरून कोणतेही राजकीय समीकरण बदलल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. सध्या तरी परळीतील या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !