भुसावळातील ‘भाईगिरी’चा आता समूळ नायनाट
भुसावळात जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगलेंची ग्वाही
भुसावळ : भुसावळातील भाई असलेल्या गुंडांसह त्यांच्या टोळी पोलिसांकडून लवकरच बंदोबस्त करण्याची ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रविवारी अहिल्या देवी कन्या विद्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत दिली. भुसावळातील तथाकथित भाईंचे लागलेले पोस्टर्स व त्यावर असलेल्या शुभेच्छुकांची आम्ही नोंद घेतली असून त्यांचा लवकरच पोलिस बंदोबस्त करतील शिवाय या पोस्टर्स लावण्यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घेतली आहे वा नाही या कारणांचाही आम्ही शोध घेवू, दोषी आढळल्यास संबंधितांची आम्ही गैर करणार नाही, असेही पोलिस अधीक्षक म्हणाले. शांतता समितीच्या बैठकीत अनेक नागरीकांनी भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख वाचला. याप्रसंगी पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारी ठेचण्यासह लवकरच भुसावळातील तथाकथीत भाईंची हद्दपारी करण्यात येईल, असा विश्वास सुज्ञ नागरीकांना दिला. शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासह त्यांची संख्या वाढवण्याचा विश्वास त्यांनी नागरीकांना प्रसंगी दिला.
बैठकीच्या व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार महेंद्र पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रस्तावना डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले.