नियम धाब्यावर बसवणारे रीक्षा चालक पोलिसांच्या रडारवर
एकाच दिवसात 55 बेशिस्त रीक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई
भुसावळ : गणवेश, बिल्ला, लायसन्स तसेच अन्य वाहतूक नियमांचे कागदपत्र न बाळगणार्या 55 बेशिस्त रीक्षा चालकांवरद्ध शहर वाहतूक शाखेने मंगळवारी कारवाई करीत प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसुल केल्याने रीक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात बेशिस्तपणे कुठेही रीक्षा थांबवण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याच्या तक्रारी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी रीक्षा चालकांची बैठक घेत नियमान्वये असलेल्या थांब्यावरून प्रवाशांची वाहतूक करण्यासह नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते शिवाय 15 नोव्हेंबरपर्यंत त्यात सुधारणा करण्याचेही बजावले होते मात्र त्यानंतरही अपेक्षित बदल न दिसल्याने रीक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे शहर वाहतूक शाखेला आदेश देण्यात आले आहेत.
अल्पवयीन रीक्षा चालक रडारवर
भुसावळ शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे त्यात पडणारी भर ही नित्याची समस्या झाली आहे. त्यातही काही रीक्षा चालक सर्रास नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. रीक्षा चालकांना खाकी गणवेश, बिल्ला तसेच वाहनाची कागदपत्रे व वाहन परवाना बाळगण्याचे आवाहन करूनही नियमांचे उल्लंघण होत असल्याने शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप आराक यांच्या नेतृत्वात बेशिस्त रीक्षा चालकांवर कारवाई केली जात आहे तसेच अल्पवयीन रीक्षा चालकही पोलिसांच्या रडारवर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

