‘अंतर्नाद’ तर्फे भुसावळातील गरजूंना फराळ, कपडे वाटप


12 कुटूंबातील 45 व्यक्तींना फराळ, नवीन कपडे वाटप : वंचितांच्या चेहर्‍यावर पसरला आनंद

भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयासमोर मोलमजूरी करुन पोटाची खळगी भरणारी कुटुंब राहतात. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने 12 कुटूंबातील 45 जणांना फराळ, लहान मुला मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेसचे वाटप करून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले. ‘वाटीभर फराळ अन नवीन कपडे देउन वंचितांची दिवाळी गोड करु या’ या उक्तीला अनुसरून अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.

वंचितांच्या चेहर्‍यावर पसरला आनंद
उपक्रमांतर्गत जी मदत गोळा झाली ती गरजूंपर्यंत तीन ते चार दिवसात पोहचवण्यात आली. दिवाळीच्या आदल्या दिवशी अंतर्नादतर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर सुद्धा 450 जणांना नवीन कपडे, फराळ, शालेय साहित्याची वाटप करण्यात आली होती. नाहाटा कॉलेज समोरील परीसरात अनेक दिवसांपासून मोलमजुरी करणारे कुटुंब राहतात.सण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा असतो.

वाढदिवसानिमित्त नवीन ड्रेसचे वाटप
अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांना या परीवारासंदर्भात माहिती झाल्यानंतर अंतर्नादच्या सदस्यांनी या कुटुंबांची आर्थिक परीस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर बुधवारी त्यांची भेट घेउन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. संस्था सदस्य रोहिदास सोनवणे यांची मुलगी डॉ.तेजश्री सोनवणे यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 लहान मुलांना नवीन ड्रेसचे वाटप या प्रसंगी केले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी अमितकुमार पाटील, रोहिदास सोनवणे, समाधान जाधव, तेजेंद्र महाजन, जीवन सपकाळे, दीपक फालक, अमित चौधरी, सचिन पाटील, डॉ.तेजश्री सोनवणे, सुजल फालक, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !