भुसावळातील बंद सिग्नलला उर्जितावस्थेची गरज


नगरपालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांची बेफिकीरी : दररोजच्या कोंडीमुळे वाहनधारकांना होतोय मनस्ताप

भुसावळ : शहरात वाढत्या लोकसंख्येसोबतच शहराचा विस्तारही दिवसागणिक वाढत आहे शिवाय दररोज रस्त्यावर येणार्‍या नवीन वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरली आहे़ सुमारे 10 ते 12 वर्षांपूर्वी पालिकेने उभारलेली सिग्नल यंत्रणा धूळखात पडून आहे़ सुरुवातीचे दोन महिने सुरळीत चाललेली सिग्नल यंत्रणा अपघात जास्त होतात या सबबीखाली बंद झाली मात्र सिग्नल नसल्याने वाहनधारक कुठूनही कुठल्याही दिशेने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ वाहतूक कोंडीचा तिढा सुटण्यासाठी सिग्नल यंत्रणेला उर्जितावस्था मिळण्याची आवश्यकता आहे़

यंत्रणा ब्रिटीशकालीन लोकसंख्येच्या आधारावरच
शहरात वाहतूक कोंडीची सर्वाधिक मोठी समस्या आहे़ वाढत्या लोकसंख्येसोबत दिवसागणिक रस्त्यावर नवीन येणार्‍या वाहनांमुळे शहरातील प्रमुख चौकात वाहतूक कोंडी होत आहे मात्र या समस्येवर तोडगा काढणारी यंत्रणा अद्यापही ब्रिटीशकालीन लोकसंख्येच्या आधारावरच अद्यापही असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर झालेला दिसून येतो. शहरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा असलीतरी त्यातही अल्प कर्मचारी आहेत़ शिवाय वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करण्याची गरज आहे़ पालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे़

एकतर्फी वाहतुकीची गरज
शहरातील सर्वात जास्त कोंडी बसस्थानकाजवळ होते़ अवैध वाहतूकदारांनी मांडलेल्या ठिय्यामुळे वेळप्रसंगी पायी चालणे कठीण होते़ त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वरणगाव भागातून येणाजया बसेस बसस्थानकात येतील व परतीच्या प्रवासात नाहाटा महाविद्यालयाकडून सोडल्यास समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भात दखल घेणे गरजेचे आहे.

एकेरी वाहतुकीला खो
शहरात अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करणे गरजेचे आहे़ पोलिस प्रशासनाकडून अनेकदा पालिका प्रशासनासह स्थानिक आगाराला या संदर्भात पत्र देण्यात आले आहे मात्र त्यानंतरही कुठलीही ठोस भूमिका संबंधितानी घेतलेली नाही़ सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास निश्चित वाहतूक कोंडी कमी होणार आहे शिवाय पालिका प्रशासनाने टोईंग वाहन घेतल्यास दंडात्मक कारवाईतील महसूल पालिकेला मिळू शकतो़

देखभालीचा अभाव
शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ, गांधी पुतळा तसेच पांडुरंग टॉकीजजवळ व नाहाटा महाविद्यालय चौफुलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती मात्र केवळ दोन महिन्यातच ती बंद करण्यात आली़ त्यानंतर देखभाल व निगा ठेवण्यात न आल्याने वर्षानुवर्षे ती बंद असल्याने आजघडीला पूर्णपणे खराब झाली आहे.

पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार : नगराध्यक्ष
बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासंर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे या संदर्भात गार्‍हाणे मांडून प्रश्‍न सोडवण्याबाबत आग्रह धरण्यात येईल, असेही नगराध्यक्ष म्हणाले.

पहिल्याच बैठकीत चर्चा : पोलिस उपअधीक्षक
भुसावळात पदभार घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, बंद पडलेले सीसीटीव्ही व अतिक्रमणासंदर्भात मुख्याधिकारी संदीप्र चिद्रेवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. या संदर्भात पोलिस विभागाकडून संबंधित प्रशासनाला दखल घेण्यासंदर्भात पत्र देण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !