दीपनगरातील संजय बर्हाटे मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी करावी
निळे निशाण सामाजिक संघटनेची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे 3 फेब्रुवारी 2020 ऑन ड्युटी सुरक्षा रक्षक व संजय बळीराम बर्हाटे यांच्यात झालेल्या वादानंतर बर्हाटे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती तालुका पोलिसांना देण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र ही माहिती अर्धसत्य असून या प्रकरणात काही निरपराध व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाची फेरचौकशी करावी, अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे भुसावळ पोलिस उपअधीक्षकांसह जळगाव पोलिस अधीक्षकांकडे 18 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्याचा दावा
3 फेब्रुवारी 2020 रोजी दीपनगरातील 210 प्रकल्पाच्या गेटसमोर रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संजय बळीराम बर्हाटे व गेट वरील ऑन ड्युटी सुरक्षा रक्षकांमध्ये काही कारणावरून वाद झाला व त्याच्या काही वेळेनंतर बर्हाटे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याला देण्यात आल्यानंतर या प्रकरणातील काही निरापराध व्यक्तींवर भादंवि 302 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. प्रथम खबरी अहवालात नमूद असलेल्या काही बाबी, अर्धसत्य दाखवून व पोलिस प्रशासनावर एक भावनिक दृष्टीने दडपण आणून पोलिस प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे काही निरपराध सुशिक्षीत व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोहपी करण्यात आला आहे. ही निंदणीय असून दोषींवर योग्य ती कारवाई अपेक्षित आहे मात्र भादंवि 302 सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात निरपराधांचे आयुष्य उद्ध्वस्त न होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने विशेष अधिकारी यांची नेमणूक करून या घटनेची फेर चौकशी करावी, अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
पोलिस प्रशासनाला निवेदन देतांना निळे निशाण सामाजिक संघटनेचे राज्य संस्थापक आनंद बाविस्कर, भुसावळ शहराध्यक्ष महेंद्र महाले, सुखदेव सोनवणे, संतोष गुप्ता, आकाश सपकाळे, युनूस शेख, दीपक लोहार, रवींद्र बाविस्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

