रावेर शहरात भाजप आक्रमक
रावेर : लॉकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या शेतकरी व सामान्य जनतेला महावितरणने चारपट वीजबिले देऊन शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या उर्जामंत्र्यांनी वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावीच लागतील, असे स्वतः स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसून करण्याच्या प्रयत्नात आहे, याचा रावेरात निषेध करण्यात आला. वीजबिलाची होळी करण्यात येऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी सदस्य सुरेश धनके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सी.एस.पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, पं.स.सदस्य कविता कोळी, सौ.योगिता वानखेड़े, विशाल पाटील, महेश पाटील, दिलीप पाटील, यशवंत दलाल, नितिन पाटील, मनोज श्रावक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

