कार्तिक एकादशीला कोथळीतील श्री संत मुक्ताबाई मंदिर बंद
कोरोना संक्रमणाचा फैलाव वाढण्याच्या भीतीने मंदिर संस्थानचा निर्णय
मुक्ताईनगर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे राज्य शासनाने 16 नोव्हेंबर 2020 पासून काही अटी-शर्थींचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. अनेक दिवसांपासून मुक्ताईच्या दर्शनाची आस लागलेली असल्याने दररोज वाढत्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनास येत असलेतरी राज्यात कोरोनाची दुसरी लाट दिसून आल्याने गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी असल्याने वारीनिमित्त हजारो भाविक श्री संत मुक्ताबाई दर्शनाला आल्यास कोरोना संक्रमणाचा फैलाव अधिक वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र, कोथळी मुक्ताईनगर विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
अन्य दिवशी सोशल डिस्टन्स पाळून घ्यावे दर्शन
गुरुवार, 26 नोव्हेंबर व्यतिरीक्त अन्य दिवशी श्री संत मुक्ताबाई मंदिरात भाविकांना सोशल डिस्टन्सचे नियम पाळून दर्शन घेता येणार असल्याचे श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी कळवले आहे.

