भुसावळात डी.एस.ग्राऊंडची अखेर स्वच्छता


प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड समितीच्या इशार्‍यानंतर पालिकेनेही पाठवला जेसीबी

भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आरपीडी रोडवरील प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड (डी.एस.ग्राऊंड) ची प्रचंड वाताहत झाल्यानंतर सत्ताधारी व पालिका प्रशासन बेदखल असल्याने प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड समितीने बुधवार, 25 रोजी सकाळी 11 वाजता स्वच्छता आंदोलनाचा इशारा दिला होता व ठरल्याप्रमाणे सुमारे पन्नासवर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत कामगार नेते जगन सोनवणे व पुष्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. पालिका प्रशासनानेदेखील आंदोलनाची दखल घेत एक जेसीबी व आठ स्वच्छता कामगार स्वच्छतेसाठी पाठवत स्वच्छता मोहिमेला बळ दिले.

आंदोलनाच्या इशार्‍यानंतर नरमले प्रशासन
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मैदानाची प्रचंड दुरवस्था झाली होती शिवाय दिवाळीच्या काळात फटाके व्यावसायीकांना व्यवसायासाठी जागा देण्यात आल्यानंतर पाईप लाईन फुटल्यानंतर प्रचंड प्रमाणात पाणी मैदानात आल्याने मैदानात पाण्यामुळे मोठा चिखल निर्माण झाला होता. 6 डिसेंबर या दिवशी महामानवाचा महापरीनिर्वाण दिन असल्याने त्यापूर्वी ही स्वच्छता होणे गरजेचे असल्याने बुधवारी आंदोलनाचा इशारा प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड समितीने तहसील, प्रांताधिकारी व पालिका प्रशासनाला दिला होता.

अखेर मैदानाची झाली स्वच्छता
बुधवारी सकाळी 11 वाजता कामगार नेते जगन सोनवणे व पुष्पा सोनवणे यांच्या नेतृत्वात समिती सचिव राकेश बग्गन, शगीर शाह, विशाल पवार, मनोहर पवार, राजेश मोरे, चंदू पहेलवान, मनोज जाधव, अ‍ॅड.शिवकुमार ससाणे, शरीफ शेख, गोपी साळी, राजेश इंगळे, हरीष सुरडकर, वनिता सुरवाडे, संतोष मेश्राम, बबलू सिद्दीकी, मौलाना मऊराणी आदींच्या उपस्थितीत स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. पालिका प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने एक जेसीबी व आठ स्वच्छता कर्मचार्‍यांना डी.एस.ग्राऊंडच्या स्वच्छतेसाठी पाठवले होते तर जेसीबीद्वारे डी.एस.ग्राऊंडवर दिवसभर स्वच्छता करण्यात आली.

या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन
पालिकेने या मैदानाला महामानवाचे नाव दिले असल्याने दोन्ही प्रवेशद्वारावर नाम फलक लावावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे प्रवेशद्वारासमोर लावावेत व तसा ठरावही करावा, क्रिकेटप्रेमी, रनर, फुटबॉलपटू यांच्यासाठी मैदानाच्या एका बाजूला स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समिती सचिव राकेश बग्गन यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !