भुसावळात बहुप्रतीक्षेतील रस्त्यांचे निकृष्ट काम


शिवसेना पदाधिकार्‍यांसह राष्ट्रवादी गटनेत्यांची निकृष्ट कामांच्या चौकशीसह दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

भुसावळ : तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरातील विविध भागात विशेष रस्ता अनुदानातून तीन कोटी रुपये खर्चाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे मात्र रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने केले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. संबंधित ठेकेदार हे ब्लॅकलिस्टेड असल्याचा आरोपही पदाधिकार्‍यांनी करीत असे असताना ठेका देण्यात आलाच कसा? असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. दरम्यान, जळगाव रस्त्याचे सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून भुसावळ शहर शिवसेनेने या रस्ता कामाच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गुण नियंत्रकांकडून व्हावी तपासणी : शिवसेना
भुसावळात चार वर्षानंतर सुरू झालेल्या रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने केले जात असून योग्य प्रकारचे मजबुतीकरण न करता निकृष्ट दर्जाचे थेट डांबरीकरण करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला आहे. जळगाव रोड येथील शाळा क्रमांक एकच्या समोर दोन तासांमध्ये गिट्टी टाकून डांबरीकरणास सुरुवात झाल्याने रस्ता उखडला गेल्याचेही निवेदनात नमूद आहे. या रस्त्याची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी शिवसेनेतर्फे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे, अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, जितेंद्र पाटील, गोकुळ बाविस्कर, अमोल पाटील व परीसरातील नागरीकांनी केली आहे.

अधिकार्‍यांनी थेट गुन्हे दाखल करावे : दीपक धांडे
काही महिन्यांपूर्वी याच कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाविरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी तत्कालीन काम निकृष्ट दर्जाचे आहे हे मान्य सुद्धा केले होते व कंत्राट रद्द केला, अशी माहिती दिली होती परंतु कारवाई झालेली दिसत नाही. आता अधिकार्‍यांनी थेट गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी केली आहे.

ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करायला सत्ताधारी पुढे येतील का?
निकृष्ट दर्जाची गिट्टी पसरवून कशीतरी दबाई करण्याचा प्रकार सोमवारी सुरू होता. यावेळी डांबराचा वापरही कमी करण्यात आला. बुधवारी संपूर्ण रस्ता खराब झाला. या कामात भ्रष्टाचार होत आहे. ऑगस्ट महिन्यात रस्ता प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांची कानभरणी केल्याचा आरोप करीत आता या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबद्दल पालिकेचे शहर अभियंता, देखरेख करणारे अभियंता व संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करायला सत्ताधारी नगरसेवक पुढे येतील का? असा सवाल या वेळी शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केला आहे.

ठेकेदारावर नगरपालिका मेहरबान
संबंधित ठेकेदार पूर्वी पासून ब्लॅकलिस्ट आहे, आता परत त्यांनाच (घरातील नातेवाईक) ठेका देऊन जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाली आहे. ठेकेदारावर नगरपालिका प्रशासन मेहरबान असून कोणत्या दबावाखाली एकाच ठेकेदाराच्या घरात कंत्राट दिला जातोय हे तर गुपीतच आहे. भुसावळ शहरात या नव्याने झालेल्या सर्वच संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे म्हणून या कामाची व गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्या, जळगाव रोडचा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात येणार आहे. तांत्रिक दोष असलेल्या या कामाची 24 तासात चौकशी करून गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हा प्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

रस्ता डांबरीकरणाची अशी आहे पद्धत
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रस्ता डांबरीकरणापूर्वी दोन इंच खडीचा थर (बीबीएम) असणे गरजेचे असून त्यानंतर 20 एमएम कारपेट व नंतर सीलकोटची प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे मात्र शहरातील रस्त्यांची कामे करताना नियम धाब्यावर बसवून कामे होत असल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !