कर्ज डोईजड झाल्याने सुनसगावात शेतमजुराची आत्महत्या
भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे शेतमजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. भानुदास हरी कंखरे (45, धनगर) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून कंखरे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनसगावच्या धनगर वाड्यातील रहिवासी भानुदास कंखरे हे 26 रोजी सकाळी जनावरांचे शेणपाणी करण्यासाठी बाहेर पडले मात्र न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता गोठ्याजवळ त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले तर जळगाव येथे हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ती भुसावळ तालुका पोलिसात शुक्रवारी वर्ग करण्यात आली. घटनेची माहिती कळताच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस शेख व राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी समाधान धनगर यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शेतमजुराने मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ असा परीवार आहे.

