भुसावळ पालिकेच्या ऑनलाईन सभेत 242 विषयांना मंजुरी


राष्ट्रवादीच्या विरोधी गटाचा सभा बेकायदेशीर असल्याचा आक्षेप : जिल्हाधिकार्‍यांकडे सभा रद्द करण्याची मागणी : दोघा विरोधकांचा मात्र सहभाग

भुसावळ : सुमारे दहा महिन्यांपासून रखडलेल्या भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेला शुक्रवार, 27 नोव्हेंबरचा मुहूर्त गवसला असलातरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांव्यतिरीक्त अन्य विरोधकांनी पाठ फिरवली तर सुमारे दिड तास चाललेल्या सभेत 242 शहर विकासाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिली. एरव्ही पालिका सभागृहात दणकून होणार्‍या सभांमुळे सत्ताधार्‍यांनी सर्व विषय मंजूर-मंजूर असल्याचा प्रघात ऑनलाईन सभेतही ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक विषयासाठी मंजूर, नामंजूर व तटस्थ असा ऑनलाईन पोल हा पर्याय असल्याची समज नगरसेवकांना दिल्यानंतर त्यांनी विषयांना मंजुरी दिल्याने गोंधळाविना सभा पार पडली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे भुसावळ पालिकेची शुक्रवारची सभा बेकायदेशीर असल्याचे सांगत ही सभा रद्द करण्यासंदर्भात निवेदनही दिले.

दिड तास चाचली सभा
शुक्रवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन पध्दतीने पालिका सभागृहात नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदींसह सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात करण्यात आली तर 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत सभा चालली. सभा अधीक्षक शे. परवेज यांनी विषयांचे वाचन केले. वेबेक्स मिटींग या साईटवर झालेल्या बैठकीत सत्ताधारी 32 तर दोन विरोधी गटाचे नगरसेवक सहभागी झाले. सर्वसाधारण सभेसमोर 242 विषयांचे वाचन झाले तर यात 137 विषय हे सर्वसाधारण स्वरुपाचे होते.

एकाही विषयावर सखोल चर्चा नाहीच
भुसावळ पालिकेच्या सर्वसभेत 242 विषयांना सत्ताधार्‍यांनी मंजुरी दिली असलीतरी एकाही विषयावर परीपूर्ण व सखोल चर्चा न झाल्याने काहीशी नाराजी नगरसेवकांनी खाजगीत व्यक्त केली शिवाय पालिका सभागृहात विविध विषयांवर रणकंदन करणार्‍या नगरसेवकांना या ऑनलाईन सभेत बोलण्यावर अनेक बंधनेही आल्याचे दिसून आले. प्रथमच झालेल्या ऑनलाईन सभेत अनेक तांत्रिक अडचणी नगरसेवकांना आल्या मात्र त्यांनी त्यावरही मात केल्याचे दिसून आले.

विरोधी गटाचा सभेवर बहिष्कार
विरोधी गटाचे नगरसेवक उल्हास पगारे, अरुणा सुरवाडे, साधना भालेराव, वैशाली पाटील, इकबाल सरदार, राहुल बोरसे, शे.सलीम, नुरजहा खान, संगीता देशमुख, शबाना खान सिकंदर, कविता चौधरी, संतोष चौधरी, निलीमा पाटील, शे.जाकिर सरदार, मिनाक्षी धांडे, शे. जाहिराबी शब्बीर, दुर्गेश ठाकूर, स्विकृत नगरसेवक शे. शकिल सत्तार हे विरोधी तर अपक्ष नगरसेवक राजकुमार खरात यांची अनुपस्थिती होती. विरोधी गटातील रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे हे दोनच नगरसेवक ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले.

शहर विकासाच्या 242 विषयांना मंजुरी : नगराध्यक्ष
भुसावळ पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या व सर्वच प्रभागातील विकासात्मक 242 विषयांना सर्वसंमतीने मंजुरी मिळाली, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. सुमारे दिड तास सभेचे कामकाज चालले, नगरसेवकांनी त्यांचे म्हणणे मांडल्याचेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !