लग्नाच्या पाच दिवसानंतर दागिन्यांसह धूम ठोकणारी विवाहिता जाळ्यात
आरोपी महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी : दागिन्यांसह रोकड जप्त
यावल : लग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर सासरच्या मंडळींच्या हातावर तुरी देवून पसार झालेल्या विवाहितेच्या यावल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस कोठडीत दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी लांबवलेल्या दागिन्यांसह मध्यस्थाकडील रोकडही जप्त केली आहे. आरोपी महिलेची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता तिची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली.
लग्नानंतर पाच दिवसात ठोकली धूम
दिगंबर देविदास फेगडे (यावल) यांचा आरोपी सोनाली कुर्हाडे (दर्गा रोड, परभणी) हिच्याशी विवाह झाला होता तर या विवाहासाठी आरोपी बहिणाबाई रावसाहेब अंधारे (दर्गा रोड, परभणी), रावसाहेब रामचंद्र कोळी, अनिल खुशाल परदेशी (अकलूज, ता.यावल) यांनी मध्यस्थी करीत विवाहसाठी 63 हजारांची रोकड लाटत मंदिरात फेगडे यांचा विवाह लावला होता. लग्नाच्या पाच दिवसानंतर आरोपी सोनालीने घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधत लग्नाच्या वेळी अंगावर घातलेले 25 हजारांचे दागिने, पाच हजारांच्या महागड्या साड्या तसेच एक हजार 300 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवत धूम ठोकली होती. यावल पोलिसात फेगडे यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
विवाहितेने अनेकांना गंडवले
यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, भूषण चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती खराटे यांनी पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत गुन्ह्यातील रक्कम व दागिने हस्तगत केले तसेच मध्यस्थांकडील रोकडही जप्त करीत औरंगाबादस्थित विवाहितेच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले शिवाय सोनाली कुर्हाडे हिचे मंगला आनंदा पवार, मंगलाबाई उर्फ सोनाली राजू शिंदे असे नाव पुढे आल्यानंतर पोलिस तपासात तिचे खरे नाव मंगला आनंदा पवार (रा.आडगाव, ता.यावल) असल्याचे स्पष्ट झाले. यावल पोलिसांनी चिंचोली शाळेतून मंगला पवार यांचा बारावी शिक्षण झाल्याचा दाखला उपलब्ध काढला शिवाय ही महिला वयाच्या लगी 15 व्या वर्षापासून आडगाव सोडल्याची माहिती मिळाली शिवाय तिच्या लग्नानंतर तिला एक मुलगा व मुलगी असल्याचीही माहिती मिळाली. चिंचोली येथील उमेश प्रल्हाद पाटील यांचीदेखील या महिलेने अशाच पद्धत्तीने फसवणूक केल्याचे समोर आले होते शिवाय यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हादेखील दाखल आहे. उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हिवाळे व भूषण चव्हाण यांनी शिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यात जाऊन तपास केला होता मात्र दलाल अद्यापही सापडलेले नाही. दरम्यान, अशाच पद्धत्तीने कुणाची असवणूक झाली असल्यास यावल पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

